10 कोटी नोकऱ्या धोक्यात, संसदीय समितीच्या रिपोर्टमध्ये माहिती

गुरूवार, 30 जुलै 2020 (09:19 IST)
कोरोनामुळे विकसनशील असलेल्या भारतामध्ये मोठे संकट उभे केलं आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊन काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले होते. त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत म्हणून काही घोषणा देखील केल्या होत्या. मात्र, तरी सुद्धा या क्षेत्रावर आलेले ग्रहण दूर होतांना दिसत नाहीये. MSME क्षेत्राला तीन लाख कोटी रुपयांचे स्वतंत्र पॅकेज देऊन सुद्धा, या क्षेत्रातील सुमारे १० कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता एमएसएमई मंत्रालयाने वर्तवली आहे. प्रवास आणि पर्यटन क्षेत्रावर झाले वाईट परिणाम दिसून येतोय.
 
एमएसएमई मंत्रालयाने सांगितल्यानुसार, कोरोना संसर्गामुळे टुरिझम आणि ट्रॅव्हल क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला आहे. त्यासाठी रद्द झालेल्या दौऱ्याचा जीएसटी परत करणे, भरणा जमा करण्यात सूट देणे आणि एक वर्षासाठी विमा प्रीमियम घेणे अशी पावले उचलावी लागतील.
 
MSME क्षेत्रात सुधारणा नाही
तसेच एमएसएमई मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम औद्योगिक क्षेत्रावर झाला आहे. ज्या ठिकाणी ७२ टक्के औद्योगिक उत्पादन होते तेथे कोरोना संसर्गाची ५० टक्के प्रकरणे आहेत. अमेरिका, युरोप आणि चीनमधील परकीय गुंतवणुकीवर भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. दरम्यान, आरबीआयने केलेल्या सर्वेक्षणात असे सांगितले आहे की, कोरोना संसर्गाच्या संकट काळात एमएसएमई क्षेत्र आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी धडपडत आहे. यातील बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आणि त्वरित मिळणाऱ्या उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. पुढील सहा महिन्यात एमएसएमई क्षेत्र उभारी घेईल याची शक्यता धूसर असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती