ब्रिटिशांविरुद्ध लढताना आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी आंदोलने करताना काँग्रेसला जितक्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या आणि संघर्ष करावा लागला, त्याहून स्वातंत्र्यानंतर भाजपाला संघर्ष करावा लागला आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
भाजपच्या नव्या मुख्यालयाच्या भूमीपूजनप्रसंगी मोदी म्हणाले की, ब्रिटीशकाळात काँग्रेसने केलेल्या संघर्षापेक्षा अधिक संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी या ५० ते ६० वर्षात केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांमुळेच आज पक्षाची प्रगती दिसत आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या घामाचा सुगंध या नव्या इमारतीत दरवळत राहिल, असेही ते म्हणाले.
मोदी यांनी बेजबाबदार वक्तव्य करून स्वातंत्र्य लढ्याचा, काँग्रेसचा आणि देशातील सामान्य जनतेचा अपबमान केला आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. स्वातंत्र्य लढ्यात भारतीय जनता पार्टी, जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वा संघ परिवारातील कोणतीही संघटना वा व्यक्ती यांचा सहभाग नव्हता. किंबहुना ते त्या काळात ब्रिटिशांना मदत करीत होते, हे देशातील जनता कधी विसरणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.