संघाकडून इफ्तार पार्टी

नवी दिल्ली: मुस्लिम विरोधी संघटना म्हणून संघाची ही प्रतिमा मोडित काढण्यासाठी चक्क संघाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. दोन जुलैला ही इफ्तार पार्टी होत असून, यासाठी पाकिस्तानसह विविध मुस्लिम देशांच्या राजदुतांना आमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संघाची सहयोगी संघटना मुस्लिम राष्ट्रीय मंचने ही पार्टी आयोजित केली आहे.
 
मुस्लिम राष्ट्रीय मंचने यापूर्वीही अनेक इफ्तार पार्टी दिल्या आहेत. मात्र यावेळी जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. इतकेच नाही तर मुस्लिम राष्ट्रीय मंचने आपल्या सदस्यांना देशभरात इफ्तार पार्टी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यामध्ये सर्वधर्मीयांना आमंत्रित करण्यास सांगितले आहे. जगाला भारतीयत्वाचा संदेश देण्याच्या उद्देशाने ही पार्टी आयोजित केली आहे, असे संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी सांगितले. जगातील मुस्लिम राष्ट्रांसाठी भारत एक आशेचे किरण आहे. त्यामुळे सर्व समुदायातील नागरिकांमध्ये बंधूभाव वाढावा, हा या पार्टीमागचा उद्देश असल्याचेही इंद्रेश कुमार म्हणाले. दरम्यान, संघाच्या पार्टीचा उद्देश जरी चांगला असला तरी त्यांच्या या कृतीला विरोधक आता कोणत्या प्रकारे विरोध करणार हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.

वेबदुनिया वर वाचा