शाहरूखने मागितली आडमार्गाने माफी!

शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2010 (18:20 IST)
IFM
बॉलीवुड जगभरात भारताचे प्रतिनिधीत्व करत असते. त्‍या भारताचा प्रतिनिधी म्हणून आंतरराष्‍ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उजळ व्‍हावी यासाठी मी आयपीएल संदर्भात मत व्‍यक्त केलं, मी जे बोलतो ते पूर्णपणे विचार करूनच त्‍यामुळे माझ्या या वक्तव्‍यामागे कुठलाही गैर उद्देश नव्‍हता मात्र कळत-नकळत कुणाचं मन दुखावलं गेलं असल्‍यास मी दिलगिर आहे, अशा शब्‍दात किंग खान शाहरूखने आज शिवसेना प्रमुखांच्‍या नावाचा उल्‍लेख न करता त्यांची ट्विटरवरून माफी मागितली आहे.

अनेक वादांचा सामना केल्‍यानंतर आणि शिवसैनिकांचे आंदोलन मोडून काढत मुंबईत अखेर 'माय नेम इज खान' प्रदर्शित झाला असून त्‍यास प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्‍याबद्दल शाहरूखने ट्विटर या सोशल नेटवर्कींग वेबसाईटवर म्हटले आहे, की मला लहानपणापासून माझ्या शिक्षकांनी कमी आणि योग्य बोलायची शिकवण दिली. माझी पत्‍नीही मला आज तेच सांगत असते. त्यामुळे मी जेव्‍हा काहीही बोलतो ते अगदी विचार करूनच. बॉलीवुड जगभरात भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मोठी संस्‍था आहे. त्‍या भारताचा प्रतिनिधी म्हणून आंतरराष्‍ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उजळ व्‍हावी आणि भारत-पाकमधील दरी सांधली जावी या उद्देशाने मी आयपीएल संदर्भात मत व्‍यक्त केलं, माझे हे मत पूर्णतः वैयक्तीक असून या वक्तव्‍यामागे कुठलाही गैर उद्देश नव्‍हता मात्र कळत-नकळत कुणाचं मन दुखावलं गेलं असल्‍यास मी दिलगिर आहे, असे शाहरूखने म्हटले आहे.

आयपीएलमध्‍ये पाकिस्‍तानी खेळाडूंचा समावेश न करणे हा त्यांचा अपमान होता, असे मत शाहरूख खानने व्‍यक्त केल्‍यामुळे गेल्‍या 15 दिवसांपासून त्‍याच्‍या विरोधात शिवसेनेने जोरदार आंदोलन उभारले असून शाहरूखच्‍या 'माय नेम इज खान'ला मुंबईत प्रदर्शित होऊ न देण्‍याची भूमिका सेनेने घेतली आहे. याबाबत शाहरूखने दुःख व्‍यक्‍त केले असून मुंबई आपली सर्वांची असून तिची प्रतिष्‍ठा जपली पाहिजे असे आवाहनही त्याने केले.

शाहरुखने ट्विटरच्‍या मदतीने शिवसेनेकडे मैत्रिचा हात पुढे केला असून त्याला ठाकरेंकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता लक्ष लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा