राहुलचे 19 एप्रिलला शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन

मंगळवार, 31 मार्च 2015 (10:48 IST)
महिनाभरापासून गायब असणारे काँग्रेसचे उपाध्क्ष राहुल गांधी दिल्लीतील शेतकरी मेळावत 19 एप्रिल रोजी उपस्थित राहणार आहेत. रालोआ सरकारच्या भूमी संपादन विधेयकाच्या विरोधात हा मेळावा काँग्रेसने आयोजित केला आहे.
 
राहुल गांधी बजेट अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच्या जवळपास महिनाभर सुटीवर आहेत. गेल्या आठवडय़ात अमेठीमध्ये राहुल गायब असल्याने पोस्टर झळकली होती. अमेठीचे खासदार गायब या शीर्षकाची ही पोस्टर अमेठीत रेल्वेस्टेशन, बस स्टँड व बाजारपेठेत झळकली आहेत.
 
दिल्लीतील शेतकरी मेळाव्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व इतर वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. सोनिया गांधी यांनी शेतकर्‍यांची  भेट घेऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत विचारपूस केली होती. 
 
मोदी सरकारला भूमी संपादन विधेयकावरून घेरण्यासाठी काँग्रेस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. सोनिया गांधी यांनी रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची चर्चेची मागणी फेटाळली आहे. भू-संपादन अध्यादेश भाजप सरकारने कोणाशीही चर्चा न करता काढल्याने सोनिया यांनी संताप व्यक्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा