श्रीनगर- कुपवाडा जिल्ह्यातील ड्रगमुला भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांना वीरमरण आले आहे. गावडे यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या अधिकार्यांकडून देण्यात आली. पांडुरंग गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सुपुत्र होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव सिंधुदुर्गातील त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहे.
जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी तब्बल नऊतास चाललेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. 47 राष्ट्रीय रायफल्स, 41 राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ‘ऑपरेशन’ राबवून संपूर्ण परिसराला घेरले आणि दहशतवाद्यांची कोंडी केली.