किरण बेदी पुडुचेरीच्या नायब राज्यपाल

नवी दिल्ली/पुडुचेरी- माजी आयपीएस अधिकारी आणि भाजप नेत्या किरण बेदी यांची पुडुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी किरण बेदी यांची पुडुचेरीच्या नायब राज्यपालपदी रविवारी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनात सक्रिय सहभागी झालेल्या व त्यानंतर भाजपमध्ये सामील झालेल्या किरण बेदी या देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. 
 
भारताचे राष्ट्रपती यांनी किरण बेदी यांची पुडुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. पुडुचेरीमध्ये नुकताच विधानसभा निवडणूक निकाल घोषित झाला असून काँग्रेसला या ठिकाणी 30 जागांपैकी 15 जागांवर विजय मिळाला आहे. तसेच त्यांचा मित्रपक्ष डीएमकेला दोन जागा मिळाल्या आहेत.
 
दिल्लीत गेल्यावर्षी 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी किरण बेदी या भाजपात सामील झाल्या होत्या. भाजपने किरण बेदी यांना ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून उभे केले होते. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता. 
 
किरण बेदी यांच्या लोकप्रियतेचा भाजपला फायदा होईल, अशी भाजप नेत्यांना आशा होती परंतु ती फोल ठरली. उलट किरण बेदी यांना कृष्णानगर विधानसभेमधून पराभव पत्कारावा लागला होता.

वेबदुनिया वर वाचा