देशाच्या 70व्या स्वातंत्र्यदिनाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी भाबरा येथे ‘आझादी 70 साल, याद करो कुर्बानी’ मोहिमेचा शुभारंभ केला. त्यानंतर अलीराजपूर इथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर भाष्य केलं. काश्मीर हा भारताचा गौरव आहे. प्रत्येक भारतीय काश्मीरवर प्रेम करतो. आयुष्यात एकदा तरी काश्मीरला जावे असे प्रत्येक भारतीयाला वाटते. मात्र, काही दिशाहीन लोक सध्या काश्मीर खोर्यात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले.
आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये शांतता व विकास हवा आहे. त्यासाठी लागेल ती मदत देण्यास केंद्र सरकार तयार आहे. भारताचे नागरिक म्हणून इतर राज्यांतील लोकांना जितके स्वातंत्र्य आहे, तितकेच काश्मिरी नागरिकांनाही आहे. काश्मिरी तरुणांनी आमच्या प्रयत्नांना साथ द्यावी आणि काश्मीरला जगाचा स्वर्ग बनविण्यासाठी प्रयत्न करावेत.