अहमदाबादमध्ये एक 40 वर्षीय पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याच्या तपासासाठी पोलीस यंत्रणा गेल्या चार दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. क्राइम ब्रांच व एटीएस येथील दाणीलीमडा भागात या व्यक्तीचा तपास करीत आहेत. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 27 एप्रिलच्या सायंकाळी गुप्तचर विभागाने गुजरात पोलिसांना याबाबत माहिती दिली होती.
यात म्हटले आहे, की अहमदाबाद येथील रहिवासी असलेला एक युवक बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेनंतरच्या दंगलींपासून पाकिस्तानात पळून गेला असून पाकिस्तानातील अनेक कट्टरवादी संघटनांच्या माध्यमातून त्याने लश्कर-ए-तैयबासाठी काम करण्यास सुरूवात केली आहे. दहशतवादी प्रशिक्षण घेतल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच तो अहमदाबादमध्ये परतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
या संदर्भात गुप्तचर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो नोकरी शोधण्याचे कारण दाखवून शहरातील खाजगी कंपन्या व फॅक्टरीमध्ये फिरत आहे. या माध्यमातून तो शहराची हल्ल्याच्या दृष्टीने रेकी करीत असल्याचेही गुप्तचर सुत्रांनी स्पष्ट केले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून अद्याप मात्र त्याचा तपास लागू शकलेला नाही.