मुंबईचा कॉस्मोपॉलिटिन तोंडावळा

मुंबईचे मूळ रहिवासी मराठी असले तरी या शहराचा तोंड़ावळा कधीच मराठी असा नव्हता. मुंबई कायमच बहूसांस्कृतिक राहिली. अर्थात मराठी लोक सुरवातीला जास्त असल्यामुळे मराठी संस्कृतीचा मात्र पगडा शहरावर होता, हेही विसरून चालणार नाही. पुढे आर्थिक राजधानी म्हणून मुंबई पुढे येत असताना बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक आले. गुजराती येथे आधीपासूनच होते. पारशीही होते. त्यानंतर मग देशाच्या इतर भागातूनही लोक येऊ लागले.

सुरवातीला मुंबई कापडाचे मोठे मार्केट होते. पण १९८२ मध्ये दत्ता सामंतांनी कापड गिरण्यात संप घडवून आणला आणि त्यानंतर मराठी माणूस मुंबईतून हद्दपारच झाला. हा संप अयशस्वी झाला. पुढे ही संधी साधून गिरणीमालकांनी हा न परवडणारा धंदा गुंडाळला आणि गिरण्या बंद पडल्या. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातून या गिरण्यात नोकरीसाठी आलेला चाकरमानी मराठी मुंबईकर मात्र या घटनेनंतर मुंबईतून बाहेर पडायला सुरवात झाली. पुढे जागांचे भाव वाढत गेले आणि ते न परवडू लागल्याने मराठी लोकांना घरे घेणे परवडेनासे झाले. पुढे तर मराठी लोक रहात असलेल्या चाळी, घरे येथे इमारती उभारण्यासाठी बिल्डर मंडळींनी तेथे रहाणार्‍या रहिवाशांना लाखो रूपये दिले आणि मग हे मुंबईकर मराठी हे पैसे घेऊन उपनगरात किंवा ठाण्याच्या पुढे डोंबिवली, बदलापुरात स्थायिक झाले. मुंबईचे मराठीपण संपत गेले, ते असे.

२००१ मध्ये केलेल्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटीच्या आसपास आहे. मुंबई महानगराचा म्हणून जो भाग ओळखला जातो, त्याची लोकसंख्या सव्वा ते दोन कोटीच्या आसपास आहे. म्हणजे जवळपास एका स्व्केअर किलोमीटरमध्ये बावीस हजार लोक रहातात, मुंबईची दाटी यावरून समजू शकेल.

मुंबईचे भाषिक संस्कृती कॉस्मोपॉलिटनच आहे, हे समजून घेण्यासाठी तेथील विविध भाषक लोकांची संख्या जाणून घेऊ. ही संख्या १९९१ च्या जनगणनेनुसार आहे. त्यानुसार मराठी लोक मुंबईत ४२ टक्के होते. होते, असेच म्हणावे लागेल. कारण यानंतर मुंबईच्या मिठीतून बरेच पाणी वाहून गेले आहे. १९९५ नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश व बिहारमधून लोंढे नोकरीच्या शोधार्थ मुंबईत आले. ९१ मध्ये गुजराथी लोकांची संख्या १८ टक्के होती. उत्तर भारतीय तेव्हाच २१ टक्के होते. आता ते जवळपास तीस टक्क्यांच्या आसपास पोहोचले असतील. तमिळ तीन, सिंधी तीन व कन्नड पाच टक्के येथे रहातात.

मराठी राज्याची मुंबई ही राजधानी असूनही मुंबईत मात्र मराठी क्वचितच बोलले जाते. येथे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा अर्थातच हिंदी आहे. या हिंदीलाही स्वतःची एक वेगळी ओळख 'बम्बैय्या हिंदी' म्हणून आहे. याशिवाय इंग्रजी, गुजराथी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात.

वेबदुनिया वर वाचा