राज ठाकरे यांनी अखेर मराठीची व्याख्या आपल्या भाषणात स्पष्ट करत, आपल्या विरोधकांची तोंडं बंद केली. मराठीची तुमची व्याख्या काय असा प्रश्न मला सारखा विचारला जातो. यावर ऐका असे सांगत, 'शिवाजी महाराज की जय, असे म्हटल्यावर, जो आपसूकच जय म्हणतो, तोच मराठी, असे राज यांनी स्पष्ट केल्यावर कार्यकर्त्यांनी 'शिवाजी महाराज की' जय असा जय घोष केला.
यानंतर ते म्हणाले की, ज्याला महाराजांचे चरित्र ऐकून अंगावर काटा येतो, तो मराठी, कुसुमाग्रजांच्या कविता ऐकण्यात जो दंग होऊन जातो तो मराठी.
राज यांनी प्रथमच मराठीची व्याख्या स्पष्ट केल्या नंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा एकच जयघोष केला. मराठीसाठी त्यांनी कळकळीची विनंतीही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसह मराठी जनतेला केली.
भाजीवाल्यापासून ते टॅक्सी वाल्या पर्यंत सर्वांना मराठीतच बोलण्याचे आवाहन त्यांनी केले. इतकेच नाही तर मंदिरात ज्याप्रमाणे आपण दक्षिणा टाकतो, त्याच प्रमाणे मराठीच्या विकासासाठी मराठी चित्रपट आणि नाटकं पाहण्याचा सल्लाही त्यांनी मराठी माणसाला दिला