महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रांतीयवाद भडकवून शहरातील सामाजिक सौहार्द बिघडवण्यच्या आरोपात मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर जामीन मंजूर झाला आहे.
राज यांस त्यांच्या 'कृष्णकुंज' या निवास्थानातून मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर विक्रोळी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने राजला तेरा दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
राज यांनी अटक झाल्यास जामीन घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे राज तुरूंगात राहणार असे वाटत असताना त्यांच्या वकिलाने जामीनासाठी अर्ज सादर केला. न्यायालयाने पंधरा हजार रूपयांच्या मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज यांना योग्य वेळी अटक झाल्याचे सांगितले. माध्यमांकडून व इतर पक्षांकडून राज यांना उशिरा अटक झाल्याची टीका करण्यात येत आहे.
ठाकरेंवर केलेली कारवाई योग्य -विलासराव मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज ठाकरेंवर केलेली कारवाई योग्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कायद्यासमोर सर्व समान असल्याचे स्पष्ट करताना राज यास अटक करण्यासाठी राज्य सरकारवर कोणताही दबाव नव्हता, असे त्यांनी सांगितले. कायदेशीर सल्यानंतरच राज यांना अटक करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यात कोणत्याही स्वरूपाचे राजकारण नसल्याचे ते म्हणाले. नाशिकमध्ये तीव्र पडसाद राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राबल्य असलेल्या नाशिकमध्ये त्यांच्या अटकेचे तीव्र पडसाद उमटले असून अटकेचे वृत्त कळताच काही मिनिटांमध्ये नाशिकमध्ये हिंसाचारास सुरूवात झाली आहे.
अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून नाशिकमधील क. का. वाघ महाविद्यालयासमोर झालेल्या दगडफेकीमध्ये एच. एल. मध्ये काम करणारे अंबादास धारराव यांना आपला प्राण गमवावा लागला. राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा पहिला बळी देखील मराठी माणूसच ठरला आहे.
नाशिकमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक झाल्याने अघोषित कर्फ्यूची स्थिती निर्माण झाली असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय राज्यमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. नाशिकमधील उद्रेकाचा तेथे राहणार्या उत्तर भारतीयांनी प्रचंड धसका घेतला असून नाशिकबाहेर जाणार्या रेल्वे आणि बसेस भरभरून वाहत आहेत.
हिंसाचारात पुणे होरपळले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक होण्यापूर्वी सुरू झालेल्या हिंसाचारात काल पुणे होरपळून निघाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जवळपास 47 बसची तोडफोड करून त्यापैकी काही बसमध्ये आग लावल्याचे वृत्त आहे. एवढ्यावरच न थांबता काही जणांनी पुण्यात दुकानांनाही पेटवून दिले. आज पुण्यात तणावपूर्ण शांतात असून मंगळवारी झालेली हिंसा पाहता शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अनिल कुंभार यांनी दिली आहे.