यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या; तब्बल ६ कोटींच्या दागिन्यांची रोखीने खरेदी केल्याचे उघड

मंगळवार, 17 मे 2022 (15:45 IST)
मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी धाड टाकली. या धाडीत त्यांच्याकडे ३६ मालमत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती पण ही संख्या आता ५३वर पोहोचली आहे. त्याशिवाय त्यांनी कोट्यवधी रुपयांचे दागिने चक्क रोखीने केल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.
 
मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नेत्याला आपली प्रतिमा जपणं गरजेचं आहे. पण अशातच यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. विभागाने धाड मारली तेव्हा पहिल्या टप्यात जाधव यांच्याकडे ३६ मालमत्तांची नोंद करण्यात आली होती. सखोल तपासानंतर या मालमत्तेतवाढ होत ही संख्या आता ५३ वर पोहचली आहे. त्यामुळे आता जाधव आणखीनच अडचणीत आले आहे. त्यांच्याकडे अजून काही मालमत्ता आहे का याचा तपासही सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे मालमत्तांचा हा आकडा अजून वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबरोबरच, जाधव राहत असलेल्या इमारतीतील अनेक घरे ही जाधवांनी विकत घेतली आहेत. याच खोल्यांच्या खरेदीतून ८० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
 
एका ज्वेलर्सवाल्याकडूनही जाधव यांनी ६ कोटींचे दागिने रोखीने खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. या ज्वेलर्सच्या मालकाचे जबाब आयकर विभागाने नोंदवले असल्याची माहिती सूत्रांची दिली. सलग चार दिवस आयकर अधिकारी जाधव यांच्या घरीच असून सखोल चौकशी केली जात आहे. बेनामी संपत्तीची कागपत्र, हार्ड डिस्क, मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, व्यवहारांची नोंदवही आदी वस्तू त्यांच्याकडे समोर आल्या आहेत. एका चेंबरमध्ये तीन खोली असलेले टेनन्सीचे राइट्स खरेदी करण्यासाठीही त्यांनी १.१५ कोटी रोख दिल्याचे समोर आले आहे. असे अनेक मोठे रोख व्यवहार त्यांनी केले असून पुढील तपास सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती