वांद्रे गर्दीप्रकरणी उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे ताब्यात

बुधवार, 15 एप्रिल 2020 (11:02 IST)
मुंबईतील वांद्रे स्टेशनवर मंगळवारी (14 एप्रिल) लोकांची मोठी गर्दी झाली होती. लॉकडाऊनच्या काळात जमा झालेल्या या गर्दी प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे याला ताब्यात घेतलं आहे. 
 
विनय दुबे याला ऐरोली येथून नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित केले आहे. विनय दुबे याने फेसबुकवर आंदोलनाची हाक दिली होती. उत्तर भारतात राहणाऱ्या व कामासाठी मुंबईत आलेल्या मजुरांना आपआपल्या राज्यात पाठवण्यासाठी आंदोलन छेडणे, 18 तारखेला एकत्र जमण्याचे आवाहन करणे इत्यादी आरोप त्याच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अफवा पसरवणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, नागरिकांना एकत्र जमवणे आणि अन्य कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
या बाबत अधिक माहिती देताना उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले, की दुबे याच्याबाबत माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. विनय दुबे सध्या आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती