संजय राऊत यांना ईडीकडून अटक, मुंबई पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल

सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (07:57 IST)
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं म्हणजेच ईडीनं रात्री उशीरा अटक केली आहे. रविवारी दिवसभराच्या चौकशीनंतर ई़डीनं त्यांना संध्याकाळी ताब्यात घेतलं होतं.
 
राऊत यांची आज वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे, त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
 
दरम्यान दुसरीकडे स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात वाकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांचा कथित कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्यानंतर राऊत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झालीय.
 
ईडीच्या कार्यालयाबाहेर रविवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी म्हटलं की, मला अटक करणार आहेत आणि मी अटक करून घ्यायला जातोय.
 
"शिवसेनेला कमजोर करण्यासाठी ही कारवाई, संजय राऊत झुकेगा नहीं, शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय याचे पेढे वाटा, बेशरम लोक आहात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, शिवसेनेला झुकवण्यासाठी सुरू आहे. शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे," असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
 
रविवारच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी एक ट्वीटही केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जो कधीच हार मानत नाही, त्या व्यक्तीला तुम्ही हरवू शकत नाही. झुकणार नाही.
 
आज (31 जुलै) सकाळपासून राऊत दाम्पत्याची ईडीकडून चौकशी सुरू होती. राऊत यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) पथकानं छापा मारला. मुंबईतील भांडुपमधील घरावर ईडीनं छापा मारला.
 
तब्बल 9 तास राऊत यांची चौकशी सुरू होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती