मुंबईत Remdesivir चा काळाबाजार, पोलिसांनी जप्त केले २५० पेक्षा जास्त इंजेक्शन

शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (13:48 IST)
राज्यात करोनाचा उद्रेक होत आहे आणि अशा अटीतटीच्या प्रसंगीही काळाबाजार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता लसीसोबतच रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. अशात मुंबई क्राइम ब्रांचने केलेल्या आणखी एका छापेमारीत 272 रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. 
 
रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करावे तसेच अधिकतम किरकोळ किंमत कमी करावी, अशी सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी केली असतानाही काळाबाजार सुरुच आहे. मुंबईच्या अंधेरी भागात जीआर फार्मा या मेडिकल दुकानात जवळपास 272 रेमडेसिवीर इंजेक्शन साठवण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. जप्त केलेले इंजेक्शन प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येणार आहेत.
 
अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यापूर्वी गुरुवारी मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने अंधेरीमधून सर्फराज हुसेन नावाच्या एका 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले होते. या आरोपीकडून पोलिसांनी 12 रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत.
 
दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करावे तसेच काळा बाजार होऊ नये म्हणून एमआरपी कमी करावी, अशी सूचना केली. 
 
राज्याला सध्या दररोज 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता एका अंदाजानुसार एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती