अपहरण किंवा अपघात नाही, ड्रायव्हरला रस्ता माहिती नसल्याने बस भरकटली- नांगरे पाटील

मंगळवार, 5 एप्रिल 2022 (07:39 IST)
सांताक्रूझमधील पोदार स्कूलची विद्यार्थ्यांची पाच तास भरकटलेली बस सुरक्षित असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने त्याला रस्ता माहिती नव्हता, त्यामुळे ही बस पोहोचायला उशीर लागल्याचं मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितलं.
 
मुंबईतील सांताक्रूझमध्ये पोद्दार स्कूलची विद्यार्थ्यांना ने-आण करणारी स्कूलबस दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर, विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली. मात्र बस शाळेतून बाहेर जरी पडली असली तरी ती बस घरापर्यंत वेळेत पोहोचलीच नव्हती. तब्बल तीन तास वेळ झाल्यानंतर पालकांना त्यांच्या पाल्यांची चिंता वाटू लागली होती. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
 
पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, "आज या शाळेचा पहिला दिवस होता, आणि त्या बसचा ड्रायव्हरही नवीन होता. त्या ड्रायव्हरने या मार्गाची रेकी केली नव्हती. त्यामुळे ही बस दोन तास उशिरा पोहोचली. मुलांना उशीर झाल्याने पालक चिंतेत होते आणि ते शाळेत पोहोचले. ही बस सुरक्षित आहे, सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. ती बस उशीरा पोहोचली म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टवर शाळा कारवाई करेल. पण यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपप्रचार करु नये."
 
"आता त्या शाळेच्या ड्रायव्हरला रस्ते माहिती नसल्याने दोन दिवस त्यांना त्याची माहिती देणार आहेत, या दोन दिवसात शाळेच्या बस बंद करण्यात येतील. ही घटना फक्त आणि फक्त ड्रायव्हरला रस्ते माहिती नसल्याने घडली आहे.
 
कुठल्याही प्रकारचे अपहरण किंवा अपघात झाल्याची घटना झाली नाही", असंही पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती