मुंबईत ८ ते १२ वी ची शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार

गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (09:53 IST)
मुंबईतल्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. आता मुंबईतल्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती यासह इतर नियमांचं पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. 
 
मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं 70 टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या 10 हजार शिक्षकांपैकी 7 हजार शिक्षकांच लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही  किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
 
राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.
 
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती