ठाणे : ग्लोबल कोवीड सेंटरमधील डॉक्टर, नर्सेससह इतर कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला गेल्याच्या निषेर्धात बुधवारी रुग्णालयातील या सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या सर्व कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा कामावरून काढून टाकण्याच्या नोटीसा दिल्या आहेत.
आंदोलन करत त्यांनी कामावर परत घेण्याची मागणी केली. सुमारे ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचार्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता अचानकपणो कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ग्लोबल रुग्णालयात जाऊन आंदोलन करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसची भेट घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. तर पालिका प्रशासनाच्या वतीने तीन दिवसांचा वेळ मागितला असून त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कोव्हिडची लाट ओसरत असल्याने या काम बंद आंदोलनाचा फारसा परिणाम जाणवत नसला तरी, भविष्यात तिसरी लाट आल्यास याच कर्मचाऱ्यांची मदत लागणार असल्याने आमच्यावर हा अन्याय असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये कोरीनाच्या पहिल्या लाटेपासून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स आणि नर्स यांची भारती करण्यात आली होती. पहिला आणि दुसऱ्या लाटेमध्ये या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. मात्र आता दुसरी लाट ओसरू लागली असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून अचानकपणे कामावरून कमी करण्याच्या नोटीसा सबंधित कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील अशाच प्रकारे नोटीस न देता या सर्व कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते.
ग्लोबल हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रवीण दरेकर यांच्या प्रामुख्याने तीन मागण्या असून यामध्ये त्यांना जोपर्यंत कंत्राट आहे तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये, मनमानी पद्धतीने कमी पगार कमी करण्यात येऊ नये तसेच पुढे या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करून घेणे अशा आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा झाली असून त्यानंतर पालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली असल्याची माहिती यावेळी ग्लोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे.