मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली,रेड अलर्ट जारी
सोमवार, 26 मे 2025 (09:42 IST)
नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात पोहोचला आहे आणि पुढील तीन दिवसांत तो मुंबई आणि इतर काही भागात पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारी भाग आणि मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.
रविवारी रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरांसाठी आणि उपनगरांसाठी ऑरेंज ते रेड अलर्ट जारी केले आहेत.
मुंबईत सकाळी 7:30 वाजे पर्यंत 21 तासांत 71.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली तर मुंबईच्या उपनगरात 17.5 मिमी पावसाची नोंद झाली. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
हवामान विभागाने पुढील 3 तास मुंबई आणि उपनगरात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे.