तोतया एनसीबी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या; नवाब मलिकांकडून चौकशीची मागणी

सोमवार, 27 डिसेंबर 2021 (15:19 IST)
मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एका भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. दोन तोतया एनसीबी अधिकाऱ्यांच्या कारवाईला कंटाळून अभिनेत्रीने आत्महत्या केली असल्याचे तपासात समजले आहे. तोतया अधिकाऱ्यांनी २८ वर्षीय अभिनेत्रीकडे खंडणी मागितली होती. मुंबईत ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचे अधिकारी छापेमारी करत होते. याचाच फायदा घेत दोन तोतया अधिकाऱ्यांनी पार्टीमध्ये सामील झालेल्या अभिनेत्रींकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी यावरुन एनसीबीवर निशाणा साधला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले की, एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. त्यामध्ये दोन तोतया एनसीबी अधिकाऱ्यांनी कारवाई करुन अभिनेत्रीला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई एनसीबीने प्रायव्हेट आर्मी बनवली होती या आर्मीच्या माध्यमातून वसुली करण्याचे काम सुरु होते. किरण गोसावी आणि मनीष भानुशालीसारखे लोक पैसे वसुल करत होते. आणखी काही तक्रारी समोर आल्या आहेत. आमची मागणी आहे. या प्रकरणामध्ये कसून तपास झाला पाहिजे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
दोन तोतया एनसीबी अधिकाऱ्यांनी भोजपुरी अभिनेत्रीकडे ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. अखेर २० लाखांवर डील झाली, परंतु वारंवार तोतया अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे अभिनेत्रीने आत्मह्त्या केली आहे. हे अधिकारी अंबोलीमधील पोलीस असल्याचे समोर आलं आहे. अभिनेत्रीने जोगेश्वरीमध्ये राहत्या घरी २३ डिसेंबरला गळफास करत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींवर कलम १७०, ४२०, ३८४, ३८८,३८९, ५०६, १२० ब या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती