समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली

शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (08:33 IST)
पालघर तालुक्यातील कोरे येथील समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.यावेळी घाबरलेल्या स्थानिक मच्छीमारांनी याबाबतची माहिती तात्काळ केळवे पोलिसांना दिली.त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळी बॉम्ब डिटेक्शन डिसपोजलच्या साहाय्याने संबंधित स्फोटकीय वस्तू निष्क्रिय केली.
 
केळवे सागरी पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या कोरे या गावी  समुद्र किनाऱ्यावरील खडकात एक बॉम्ब सदृश्य वस्तू दिसली.त्यामधून धूर निघत असल्याचं मच्छीमारांनी बघितलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांना याबाबतची माहिती दिली.पाहणी केल्यावर साधारणपणे 2 फुटाची ती वस्तू होती.त्यावर मार्कर असे लिहिले होते. तसेच सदर वस्तूमध्ये फॉस्फरस असल्याने ही सामग्री हाताळू नका,असा संदेश इंग्रजीत लिहिलेला होता.ही वस्तू ज्वलनशील असल्याने गायकवाड यांनी आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधत बॉम्ब डिटेक्शन डिसपोजल पथकाला पाठविण्याची विनंती केली. काही वेळाने स्कॉड आल्यानंतर त्यांनी त्या वस्तूची तपासणी केली. यावेळी संबंधित बॉम्ब सदृश्य वस्तू रुट मार्कर असल्याचे स्पष्ट झाले. या वस्तूमध्ये असलेल्या फॉस्फरसचा हवेशी संपर्क आल्यास ती वस्तू पेट घेते. त्यामुळे ही वस्तू माणसाच्या सहवासात आल्याने मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. त्यामुळे स्कॉडने ती वस्तू जाळून निष्क्रिय केली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती