मुंबईत दहशतवादी हल्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईकरांनी पुन्हा एकदा जिगरबाजपणाचे दर्शन घडविले आहे. मुंबईची लाईफ-लाईन असणारी लोकल सेवा सुरूच असून मुंबईकरांच्या नेहमीच्या कामकाजात कोणताही बदल झालेला नाही. ज्याठिकाणी घटना घडली आहे त्या परीसरात तणाव कायम असला तरी इतरत्र जनजीवन सुरळीत आहे.
मुंबईला दहशतवाद नवीन नाही. यापूर्वी अनेकवेळा याठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत पण, याला भिक न घालता मुंबईकरांनी एकमेकांना मदतीचा हात देत दहशतवादाचा धैर्याने मुकाबला केला आहे. बुधवारी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्यामुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. या हल्यामुळे देशभरात भिती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पण, मुंबईकरांनी यावेळी धैर्याने मुकाबला केला आहे. बुधवारी रात्रभर सुरू असणा-या चककमींच्या बातम्या ऐकताना मुंबईकरांनी रात्र जागून काढली. आज गुरूवार सकाळपर्यंत कमांडोंची कारवाई सुरू आहे आणि तणाव कायम आहे. शाळा व महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या आहेत आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सरकारने केले आहे पण, मुंबईकरांनी या भ्याड दहशतवादी हल्यालाही भिक न घालता आपल्या कामावर परीणाम होऊ दिलेला नाही. या जिगरबाजीला सलाम करत रेल्वेनेही लोकल-सेवा सुरू ठेवली आहे. दक्षिण मुंबईकडे जाणा-या लोकलमध्ये तुलनेने कमी गर्दी असली तरी लोकांमध्ये म्हणावे तसे घबराटीचे वातावरण नाही. आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षेच्या काळजीने फोन लाईनवचा लोड मात्र वाढला आहे.