ताज महल व हॉटेल ओबेरॉयमध्ये अडकलेल्या ओलिसांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) अभियान सुरू झाले असून दहशतवाद्यांकडून सातत्याने गोळीबार व ग्रेनेड्स फेकले जात आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलासोबत नौसेनेच्या कोस्टगार्ड व शीघ्र कृती दलाचे जवान सहभागी झाले आहेत. ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात असून काही वेळातच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळणार आहे.
या ऑपरेशनमध्ये कोस्टगार्डच्या हेलीकॉप्टर्सचीही मदत घेतली जात आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालक अनामी रॉय यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार हॉटेल ताजमध्ये अजून अनेक जण अडकून आहेत. सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक मजल्यावरील बंदी बनून असलेल्यांची सुटका करीत वर पोचत आहेत. एकाच वेळी ताजमहल व ओबेरॉय या दोन्ही हॉटेलमध्ये सैन्यदलाची कारवाई सुरू आहे.
पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार जवान आतपर्यंत ताजमध्ये शिरल्यानंतरही प्रत्यक्ष दहशतवाद्यांशी सामना झाला नव्हता. मात्र दहशतवाद्यांकडून सातत्याने गोळीबार व ग्रेनेड फेकले जात आहेत. दहशतवाद्यांना एकतर अटक केली जाईल किंवा ठार केली जाईल याशिवाय त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारूगोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, तटरक्षक दलाच्या हेलीकॉप्टर्सने समुद्रावर पाळत ठेवली असून एका माहितीनुसार भारतीय नौसेनेचे जवान एका संशयास्पद जहाजाचा पाठलाग करून ते ताब्यात घेतले आहे.