संशयीत जहाज सापडले

दहशतवादी ज्या जहाजातून आले त्या जहाजाच्या शोधासाठी गेलेल्या भारतीय नौसेनेच्या कोस्टगार्डने 'एम व्ही अल्फा' हे संशयीत जहाज ताब्यात घेतले असून हे जहाज मुंबईकडे आणण्यात येत आहे. या कारवाईमुळे हल्यामागील सर्व षडयंत्राचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एका छोट्या नावेतून मुंबईत दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी ताज,ओबेरॉय हॉटेलसह मुंबईतील 11 मध्यवर्ती ठिकाणी हल्ला चढविला. दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी कमांडो सरसावले असले तरी दहशतवादी नेमके कोठून आले? याचा सर्वप्रथम उलगडा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पोलिसांनी मच्छिमार वस्तीतून एक नाव ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. या नावेमध्ये सापडलेल्या कागदपत्रांमध्ये कराचीचा उल्लेख असल्याने या हल्याचा कट पाकिस्तानातच शिजला असल्याची माहिती पुढे आली आहे. हाच धागा पकडून पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे. दहशतवादी कराचीतून गुजराथमध्ये आले आणि येथून समुद्रममार्गे मुंबईत दाखल झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या जहाजातून ते आले असावेत त्यांचा शोध घेण्यासाठी कोस्टगाडेचे पथक रवाना झाले होते. त्यांना यश आले असून 'एम व्ही अल्फा' या संशयीत जहाजास ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात येत आहे. लवकरच हे जहाज मुंबईत दाखल होणार असून याच्यातून दहशतवाद्यांच्या संपुर्ण कटामागची माहिती उजेडात येईल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे.

वेबदुनिया वर वाचा