मृत्यूचे राजकारण करणारे नतद्रष्ट राजकारणी

WD
मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी हल्ला करून दहशतवाद्यांनी येथील सुरक्षायंत्रणेच्या ठिक-या उडविल्या. सर्वसामान्य ना‍गरिकांच्या सुरक्षिततेची प्रमुख जबाबदारी असणा-या राजकारण्यांची तोंडे आता तरी बंद होतील, अशी अपेक्षा होती पण, मृत्युचे राजकारण करण्याची संधी या नतद्रष्ट राजकारण्यांनी सोडली नाही. मुंबई, दिल्ली, गुजराथ एवढेच काय तर संसदेवर हल्ला झाला तरी एकसंघतेचे गोडवे गात पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढे करणा-या सरकारच्या 'तोफेत पाणी' असल्याचे लक्षात घेऊन दहशतवाद्यांनी देश पोखरण्यास सुरूवात केली. यामध्ये बळी जातोय तो सामान्य नागरिकांचा.

अणू चाचणीचे शक्तीप्रदर्शन करत आपण महासत्ता असल्याचे छाती ठोकून सांगणा-या भारताची हवा, हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दहशतवाद्यांनी एका दिवसात काढून टाकली, तरीदेखील निर्लज्ज राजकारण्यांचे डोळे उघडले नाहीत. लोकांचा जीव वाचविण्यामध्ये आपण अपयशी ठरलो याची लाज वाटून घेऊन राजकारण्यांनी गप्प बसण्याची गरज होती. पण, मेलेल्यांच्या टाळूचे लोणी खाऊन आपली दुकाने चालविणा-या या लोकांनी अपेक्षेप्रमाणेच या घटनेचेही राजकारण करण्याचा उर्मटपणा केला आहे. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाची कल्पना गुजराथने दिली असल्याची बातमी बुधवारी आली आणि या राजकीय संघर्षाला उधाण आले.

एकीकडे दहशतवादी सामान्य लोक आणि पोलिसांचा बळी घेत होते आणि दुसरीकडे बुलेटप्रुफ गाड्यांमधून बॉडीगार्ड घेऊन फिरणा-या भ्याड राजकारण्यांचा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा राजकीय खेळ सुरू झाला. मुंबईतील दहशतवाद रोखण्यात राज्य शासनाला अपयश आल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे पण, सत्ताधा-यांमधील पोपटांनी केवळ गर्जना करण्यातच वेळ मारून नेली. दहशतवाद्यांचे मुडदे पाडण्याची भाषा करणा-या या लोकांचे हात यापूर्वी बांधले होते का? मुख्यमंत्री या नात्याने विलासराव देशमुख यांनी आपली चुक मान्य करण्याची गरज होती पण, गुजराथने आपणास माहिती दिली नाही, असे सांगत ते अप्रत्यक्षरितया मोदी सरकारवर टीका करत पळवाट काढू लागले. गुजरातने इराशा दिला तर तुम्हा सतर्क होणार असाल तर तुमची सुरक्षायंत्रणा झोपली होती काय? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. दशहतवाद्यांचे मुडदे पाडू अशी गर्जना करणा-या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बळी गेलेल्या पाच पोलिस अधिका-यांची भरपाई ते कशी करणार आहेत? हे अगोदर स्पष्ट करावे.

केंद्रातील पात्रेही यापेक्षा वेगळी नाहीत. झेड-प्लस सिक्युरिटी घेऊन फिरणा-यांना दहशतवाद काय कळणार? देशाला संदेश देताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आता संयमाची हद्द झाली असे म्हटले. यात काय विशेष आहे. हे भाषण दहशतवाद्यांनी ऐकले असते तर पंतप्रधानांची 'आक्रमकता' पाहून जणू ते घाबरून पळूनच गेले असते. बळी गेलेल्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून मगरीचे अश्रू ढाळणा-या या नेत्यांना आता आपल्या सत्तेची काळजी असल्याचे स्पष्ट जाणवले. पंतप्रधान होण्याची स्वप्ने बाळगणारे भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपण आक्रमक असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान व सोनिया गांधींनी त्यांना आपल्यासमवेत मुंबईत येण्याची विनंती केली होती पण, ती धुडकावून लावत अडवाणी पहिल्या विमानाने मुंबईत दाखल झाले आणि घटनास्थळावर राजकीय भाषण ठोकून ते निघून गेले.

आपल्या दौ-यांमुळे पोलिसांवर ताण वाढेल आणि सुरक्षेच्या कामात अडथळे येतील, याची पर्वा न करता केवळ राजकीय टीका करत नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले. मुंबईत कारमधून फिरण्याची मागणी करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्यास ते चुकले नाहीत. ज्या एटीएस अधिका-यांवर त्यांनी टिका केली होती त्याच अधिका-यांनी हा कोणता दहशतवाद आहे, हे न बघता धाडसाने मुकाबला करून आपला ‍जीव गमावला आहे, हे मोदींना कुणीतरी सांगण्याची गरज होती.

एकूणच मुंबईत झालेल्या हल्यानंतर राजकारण्यांची वक्तव्ये लक्षात घेता त्यांना सामान्य लोकांच्या जीवाशी काहीच देणेघेणे नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता त्यांना याच भाषेत प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे.

वेबदुनिया वर वाचा