मुंबईवर समुद्रमार्गे केलेल्या हल्ल्यातून पाकिस्तानने सागरी सुरक्षेसंबंधी केलेल्या कराराचा सर्रास भंग केला असून पाकच्या या दुस्साहसाचे उत्तर त्याच पध्दतीने देण्याची गरज आहे. मुंबईवर केलेला हल्ला हा देशावर केलेला हल्ला असून दहशतवाद उखडून टाकण्यासाठी केंद्राने कठोर कारवाई करावी, अशी मागणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मुंबईतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या एटीएस प्रमुख हेमंत करकरे व साळस्कर यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले असताना ते बोलत होते. मोदी म्हणाले, की भारत आणि पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात केलेल्या एका करारानुसार एकमेकांच्या सागरी सीमांचे उल्लंघन व शस्त्रास्त्रांचा न करण्याचे आणि कुणालाही करू न देण्यासाठीचा करार केला आहे. मात्र दहशतवाद्यांना भारतीय सीमेत पाठवून पाकिस्तानने या कराराचा भंग केला आहे. त्यामुळे आता अंतिम लढाई लढण्याची वेळ आली आहे.
मोदी म्हणाले, की पाकिस्तानकडून आमच्या मासेमा-यांना अनेकदा अटक केली जाते त्यावेळी त्यांची जहाजेही जप्त केली जातात. मात्र ती परत केली जात नाहीत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मी अनेकदा सांगितले आहे की ती जहाजे परत घेतली गेली पाहिजेत कारण त्यांचा वापर भारतीय हद्दी घुसण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. आणि आज ती भिती खरी ठरली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहिदांच्या सन्मानासाठी एक कोटी रुपये
दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस आणि एटीएसच्या 14 अधिकारी व जवानांच्या सन्मानार्थ गुजरात सरकारकडून एक कोटी रुपयांचा निधी उभरला जाईल अशी घोषणाही मोदी यांनी केली आहे.