ऑपरेशन ताज यशस्वी - हसन गफूर

सोमवार, 3 मे 2010 (15:46 IST)
58 तासांच्या अथक परिश्रमानंतर हॉटेल ताजमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात एनएसजीला यश मिळाले असून ऑपरेशन ताज यशस्वी झाल्याची घोषणा पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी केली. मात्र एनएसजी प्रमुख जे.के. दत्ता यांनी पत्रकारांना बोलताना संगितले की, ताजमधील दोन दहशतवादी ठार झाले असले तरी ताजमध्ये अजून दहशतवादी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आता ताजच्या खोल्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ताजचे चेअरमन यांना ताजमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी दहशतवादाचा अंत झाल्यानंतर कमांडो, लष्कर जवान, मुंबई पोलीस व फायर ब्रिगेडच्या जवानांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

हॉटेल ओबेरॉय आणि नरीमन हाऊसवर कमांडोंनी शुक्रवारीच ताबा मिळवला होता. त्यामुळे नव्या स्फूर्तीने ऑपरेशन ताजला आज सकाळीपासून वेगाने सुरू झाले. त्यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात कमांडोंना यश मिळाले आहे. ताजमध्ये घुसलेले चार दहशतवाद्यांपैकी दोन जणांना कमांडोंनी कालच कंठस्नान घातले होते. उरलेले दोन जणांनी कमांडोंच्या नाकी नऊ आणले होते. आज सकाळी त्या दोन दहशतवाद्यांचा कमांडोंनी मोठी शिताफीने मारण्यात यश मिळविले आहे. आज सकाळीच कमांडोंची एक तुकडी ताजमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या उद्देशाने शिरली आणि यश मिळविले.
दोघांना ठार केल्यानंतर ऑपरेशन ताज यशस्वी झाल्याची घोषणा मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी केली.
दरम्यान, कमांडो व पोलिस ताज हॉटेलची कसून तपासणी करत आहेत. ताजच्या काही रूममध्ये निरपराधी नागरिकांचे शव तर ताजच्या जिन्यावर ही काही नागरिकांचे शव पडलेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा