यूवर व्हॅलेंटाईन

NDND
व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना तो कसा सुरू झाला हे जाणून घेणेही गरजेचे आहे. रोम राज्यात आठशे वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाईनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने वेलेंटाईनला तुरुंगात कैद केले.

तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचे जेलरच्या आंधळ्या मुलीवर प्रेम बसले. त्याच्या प्रेमाच्या शक्तीने त्या मुलीचे अंधत्व नाहीसे झाले, असे सांगितले जाते. इसवी सन 269 च्या 14 फेब्रुवारीला प्रेम केल्याची शिक्षा म्हणून व्हॅलेंटाईनला फाशी दिली गेली. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'यूवर व्हॅलेंटाईन, तुझा चाहता' या वाक्याने केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनच्या स्मरणानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

वेगवेगळ्या देशात व्हॅलेंटाईन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. 18 व्या शतकात इंग्लंडमध्ये तरुणी कागदाच्या तुकड्यावर काही मुलांची नावे लिहून ते कमळात ठेवून पाण्यात बुडवीत असत. ज्या मुलाचे नाव पाण्यावर तरंगत वर येत असे त्यालाच आपला जन्माचा जोडीदार बनवीत असत. या दिवशी सोनेरी पक्षी नजरेस पडला तर श्रीमंताशी लग्न आणि गौरैया पक्षी नजरेस पडला तर गरीबाशी लग्न होते, अशीही समजूत असे. इटलीत उपवर मुली खिडकीत बसून वाट बघत आणि जो तरुण आधी दिसतो त्याला त्या वरत.

डेन्मार्कमध्ये तरुण-तरुणी प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट पत्र लिहितात, त्यालाच जोकिंग लेटर म्हणतात. जर्मनीत लहानशा कुंडीत कांद्याचे बीज पेरले जाते. प्रत्येक कुंडीवर एका तरुणाचे नाव लिहिले जाते. ज्या कुंडीत पाहिल्यांदा अंकुर फुटतो त्यालाच आपला व्हॅलेंटाईन मानतात. पाश्चात्य देशात साजरा केला जाणारा हा दिवस आता भारतात देखील उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी फुले आणि ग्रीटींग कार्डांची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

व्हॅलेंटाईन डे फक्त प्रियकर-प्रेयसी किंवा पती-पत्नीत साजरा केला जाणारा भारत हा एकमेव देश आहे. परदेशात मात्र याचा अर्थ व्यापक आहे. एक मुलगा आपल्या 70 वर्षे वयाच्या आजीलाही लाल गुलाब देऊन आपला व्हॅलेंटाईन बनवू शकतो. व्हॅलेंटाईन म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो अशी व्यक्ती. आपण डोळे बंद केल्यावरदेखील त्याचेच अस्तित्व आपल्या डोळ्यांसमोर तरंगत राहते. ज्याप्रमाणे मीरेने कोणत्याही स्वार्थाशिवाय कृष्णावर प्रेम केले त्याप्रमाणे. एखाद्या आईसाठी आपल्या मुलापेक्षा कोणता प्रेमळ व्हॅलेंटाईन असू शकेल? मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो. व्हॅलेंटाईनचा खरा अर्थ आहे कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम.

वेबदुनिया वर वाचा