आर्मेनियाच्या बादशाहाची मुलगी शिरी अतिशय सुंदर होती. तिचे चित्र पाहूनच पर्शियाचा राजा खुसरो तिच्यावर फिदा झाला होता. त्याने आपल्या शिपायांमार्फत तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. खुसरोचा प्रस्ताव शिरीने मान्य केला, पण एका अटीवर. पर्शियाचे लोक व आपल्या स्वतःसाठी दुधाचा सागर आणून द्यावा ही ती अट. या सागरासाठी कालवे खोदण्याचे काम ज्याच्याकडे देण्यात आले होते, त्याचे नाव फरहाद. दरम्यानच्या काळात खुसरोने शिरीशी निकाह केला होता.
खुसरोने शिरीच्या सल्ल्यानुसार कालव्यांची खोदाई व्हावी यासाठी फरहादची तिच्याशी गाठ घालून दिली. शिरीला पाहताच फरहाद तिचा दिवाना झाला. कालवा खोदता खोदताच तो तिच्या नावाचा जणू जपच करू लगाला. एके दिवशी कालव्याचे काम पहायला शिरी तिथे आली. तिच्या प्रेमात बुडालेल्या फरहादने तिच्या पायावर झुकून तिच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगितले. शिरीने मात्र त्याला झिडकारले.
पण सच्च्या प्रेमाचा पराभव कधी होतच नाही. शिरीचे नामस्मरण करता करता फरहादने कालवा खोदला पण तो आता शिरीच्या प्रेमात वेडा व्हायचाच बाकी राहिला होता. खुसरोला त्याच्या शिरीप्रेमाची खबर कळताच, त्याचा संताप अनावर झाला. त्याला खुसरोने बोलावणे पाठवल्यावर त्याने त्याच्यासमोर जाऊन आपले शिरीवर प्रेम असल्याचे सांगितले. खुसरोने त्याची तिथेच खांडोळी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वझीराने त्याला रोखले. फरहादने डोंगर फोडून रस्ता बनविल्यास त्याचा शिरीशी निकाह करून देण्यात येईल, असे त्याला सांगणअयात आले. फरहाद हे करूच शकणार नाही, अशी त्यांची खात्री होती. पण प्रेमात दिवाना झालेल्या फरहादने ही अट कबूल केली. रस्ता बनविण्याच्या नादात त्याने खाणे-पिणे सोडून दिले. त्याच्या या अनिवार प्रेमाची जाणीव अखेर शिरीलाही झाली.
फरहादने आव्हान म्हणून बनवायला घेतलेला रस्ता पूर्ण व्हायला आला होता. तो पाहून खुसरो घाबरला. त्याने शिरीने आत्महत्या केल्याचा खोटा निरोप फरहादकडे पाठवला. तो निरोप ऐकताच फरहाद वेडाच झाला. त्याच भरात त्याने स्वतःच्या डोक्यावर कुर्हाड मारून आत्महत्या केली.
शिरीला फरहादच्या मृत्यूची बातमी कळताच ती तातडीने त्या जागी गेली. फरहादचे आपल्यावरचे निस्सीम प्रेम पाहून तिला प्रचंड धक्का बसला. खुसरोने तिला राजवाड्यात परतण्याचे आदेश दिले. पण तिने हा आदेश धुडकावला आणि तिथेच आपल्याला मृत्यूच्या हवाली केले.
या दोन प्रेमीजनांचे बरोबरच दफन करण्यात आले. त्यांच्या प्रेमाची कहाणी त्यांच्या या त्यागामुळेच अमर बनली आहे.