बायको वाल्याकोळयाची

गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (08:40 IST)
वाचायला जर विचित्र वाटतंय ना ?पण आज तिचीच गरज आहे*
बायको कशी असावी ?
बायको असावी तर, वाल्या कोळयाच्या बायकोसारखी.....
 
 रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस, या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण, म्हटले की, आम्हां भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात...!
 
'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'!
'पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !', 
भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !',
'पत्नी असावी तर, सीतेसारखी !'
'भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी'
 
सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी?
 मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा. 
तो म्हणजे,
 
'बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !'
कारण तीच खरी रामायणकर्त्याची 'कर्ती ' आहे ! हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले आहे.
रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.
 
वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले!
 
'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस ?' असे विचारल्यावर, 'माझ्या बायको-पोरांसाठी'! 
असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात!
'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?
'तुम्ही इथेच थांबा, मी विचारुन येतो' असे म्हणत, वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. 
वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की, नाही?'
 
आता असा विचार करा! शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार?
पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता,  *'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!' असे सडेतोडपणे सांगितले.
नंतर तीच घटना वाल्या कोळ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.
गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. 
तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकीऋषी  होऊन रामायण हे महाकाव्य रचतो.
 
ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही! की, समजा, वाल्या कोळ्याच्या बायकोने,  'व्हयं..आम्ही आहोतच की, तुमच्यासंग !' असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?
नारदाचं काही खरं नव्हतंच पण, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते? अशी रास्त शंका घेता येऊ शकते !
 
पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या " "सुसंस्कृत भारतीय गृहिणी"  नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल..!
फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगिकारला पाहिजे. असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल ! पुन्हा एकदा आपल्या भारत 'भू' वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळ्याचे वाल्मिकी मुनींमध्ये रुपांतरीत झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल...यात शंकाच नाही...!!!
 
- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती