अरे संसार संसार......

स्नेहल प्रकाश

गुरूवार, 21 मे 2020 (10:01 IST)
शेजारी एक सानिका-सुशील हे नवपरिणित दाम्पत्य रहायला आले. कुतुहल मिश्रित चौकशीतून कुठून आले कुठे काम करतात वगैरे कळले. एव्हाना मी त्यांची मावशी झाले होते. दोघेही सकाळीच घराबाहेर पडत. सानिका उत्साही व्यवस्थित मुलगी होती. ती क्वचित आमच्या घरी यायची तेव्हा माझ्यातली आजीबाई जागी व्हायची.
 
तुला स्वयंपाक येतो का ? विचारले असता
 
हो येतो ना थोडा थोडा.. 
 
सकाळी कं. लंच घेतो संध्याकाळी काय कधी वरण भात, कधी पोळी भाजी, कधी खिचडी असे मी 3 दिवस कधी सुशील 3 दिवस असे करतो. संडेला बाहेरचे काही मागवतो किंवा मॅगी वगैरे.
 
एकंदर फार छान चाललंय आमचं....
 
मला गंमत वाटली ऐकून. पण असं कसं ग ?
 
कितीतरी गोष्टी असतात घर म्हंटल की....
 
दूध दूभतं, कपडे, भांडी, बाया, प्रेसवाला, भाजी किराणा, घरातली आवर सावर, जाळे जळमटे, बाईकडून किंवा स्वतः सुटीच्या दिवशी करायची कामे....गॅस  सिलेन्डर....अनेक प्रकारची बीलं.... मी आपली अनुदिनी अनूतापे तापलो रामराया म्हणत संसाररूपी गाडा हाकत असताना हे लोक एवढ्या सहज सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतात ?
 
त्यावर तिचे उत्तर ठरलेले सगळी कामे आम्ही 50/50 करतो. जास्त घोळ घालत नाही. माझ्या मनातले काही प्रश्न मात्र अनुत्तरितच.....ह्यांना कधी गरम उपमा पोहे शिरा खावासाच वाटत नसेल का ? कपड्यांच्या पसारा कोण आवरत असेल...वगैरे अरसिक, अनरोमँटिक विचार यायचे थांबत नव्हते.
 
अशीच एकदा सुशीलशी गाठ पडली. उदास दिसला. विचारल्यावर हळूच म्हणाला मावशी आईची हल्ली फार आठवण येते. गुगल वर सगळ्या रेसिपीज मिळतात...विकतही पदार्थ मिळतात पण मला कंटाळा आलाय....
 
थालीपीठ, उकडपेंडी, शेवयाची खीर, शेवग्याच्या शेंगांची भाजी, चिंच गुळाचं वरण ह्या तेव्हाच्या नावडत्या गोष्टींची आता तीव्रतेने आठवण येते. दोघांचीही परिस्थिती साधारण सारखीच झाली होती....
 
हत्तीच्या एवढेच काय ? मी खाऊ घालेन की... मला श्रावणात आयतेच मेहुण घडेल. 
दोघांनाही पुरणावरणाचे जेवू घातल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही समाधान होते. जाताना डबडबलेल्या डोळ्यांनी सानिका म्हणाली मलाही असे कधी करायला जमेल का हो मावशी....
 
तिला सांगितले अगं तुला असं वाटणं हेच तू संसारी होत असल्याचं द्योतक आहे.. आताचे फुलपाखराचे दिवस आहेत तुझे...हळूहळू आपोआप संसारी होत जाशील...मग आहेच 'खुर्ची का मिर्ची.....जाशील कैशी...

विनीत - स्नेहल खंडागळे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती