सुरुवातीला स.न.वि.वि. असे लिहिल्यामुळे मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय असे कदाचित वाटु शकेल. पण अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही.
हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते हे सुध्दा विसरायला झाले आहे. उतारवयात स्मरणशक्ती कमी होते म्हणून काही गोष्टी विसरायला होतात. पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसरायला झाले आहेत.
खरेच मोबाईल सारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवनवीन शोधामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरीही पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात. आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली.......
•||• श्री •||• लिहून पत्राची सुरुवात.
श्री.रा.रा. श्रीमान राजमान्य राजश्री.
स.न.वि.वि. सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
तिर्थरुप आई / बाबा.
शि.सा.न. शिर साष्टांग नमस्कार.
या सारखे शब्द वाचायलाच मिळेनासे झाले आहेत.
कळविण्यास आनंद होतो की..... असे लिहून पत्राची सुरुवात झाली तर पुढे आनंदाची बातमी आहे म्हणून पत्र अक्षरशः अधिरतेने वाचले जायचे. (दोन वेळेस)
पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे.......
कळावे, लोभ असावा.
आपला.
तुझाच.
आपला आज्ञाधारक.
मो.न.ल.अ.उ.आ. मोठ्यांना नमस्कार, लहानांना अनेक उत्तम आशिर्वाद छोट्यांना गोड पापा असे लिहून तान्हुल्यांची सुध्दा आवर्जून आठवण ठेवली जायची. यात गोड पापा असे वाचतांना सुध्दा खरेच लहानांचा गोडपापा घेतला जातोय असा भास व्हायचा.
हे आणि या सारखे शब्द शाईच्या पेन सारखेच झाकण (टोपण) लाऊन जवळपास कायमचे बंद झाले आहेत असे वाटते.
त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले आहेत.
त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले आहेत.
कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेन मुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले.
आतातर मोबाईल वरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो.
खरेच या शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता आणि आहे.
पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे.
पत्रांच्या ऐवजी आता ई-मेल येतात. यात सुध्दा, Dear, Sir/Madam, Respected Sir/Madam अशी सुरुवात आणि Regards, Yours असे लिहून शेवट होतो. यात आपलेपणा जाणवतच नाही. कार्यालयीन आणि कोरडे वाटतात हे शब्द. त्यात नात्यातला ओलावा नाहिच. Yours faithfully यापैकी फेथफुली वर तर मला फुलीच (X) माराविशी वाटते.
यातही स.न.वि.वि. सारखेच नुसतेच GM, GN असे लिहिण्याची सवय आहे. पण सुप्रभात, शुभ रात्री, शुभ रजनी ची *मजा GM (गम) GN (गन) मध्ये नाही.
आजकाल फोनवरच बोलणे *(त्यातही काही वेळा व्हिडिओ कॅाल) होत असल्याने साष्टांग नमस्कार, आशिर्वाद, गोड पापा अशा शब्दांच्या ऐवजी मग काय? कसे काय? बाकी सगळे ठिक आहेत ना? असे बाकी (चे) विचारुनच नात्यांची शिल्लक (बाकी) विचारली जाते, किंवा पाहिली जाते.*
पत्र आले की आनंद व्हायचाच पण मोठे पत्र (अंतर्देशीय) आले की ते व्यवस्थित उघडुन (खरेतर फोडून) रविवारच्या पुरवणी सारखे त्याचे वाचन व्हायचे. पण आता हे सगळे हरवले आहे असे वाटते.