अशी घ्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी

रविवार, 23 फेब्रुवारी 2020 (17:13 IST)
महिला आणि दागिने हे समीकरण काही वेगळे नाही. काळानुसार दागिन्यांचे स्वरुप बदलले असले तरीही सोन्याच्या दागिन्यांची महिलांमध्ये असणारी आवड आजही तितकीच आहे. लग्र समारंभात किंवा काही विशेष कार्यक्रमात आपण सोन्याचे दागिने वापरतो; पण नंतर मात्र घाईगडबडीत कपाटात तसेच ठेऊन देतात.

सण समारंभ सोडले तर या दागिन्यांचा वापर होतच नाही. काही सोप्या गोष्टी केल्यास हे दागिने कायम चमकदार दिसून आपण उठून दिसू शकतो. मात्र घरच्याघरी ही काळजी कशी घ्यावी याची माहिती आपल्याला नसते. यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी आणल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही आपल्या सोन्याच्या दागिन्यांची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकता.
 
सोन्याचे दागिने वापरताना ते सतत रसायनांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. अनेकदा आपण अंगावर दागिने घालूनच आंघोळीला जातो किंवा धुणी भांडी करत असतो. या क्रियेत दागिने हे साबण किंवा शॅम्पूच्या संपर्कात येतात, यामुळे तुमच्या सोन्यावर असलेली झळाळी कमी होऊ शकते.
 
सोन्याचे दागिने इतर कोणत्याही दागिन्यांसोबत ठेवू नका. शक्यतो प्रत्येक दागिन्यांसाठी वेगळा बॉक्स ठेवा. मोत्याचे, चांदीचे आणि इतर खोट्या दागिन्यांच्या संपर्कात सोन्याचे दागिने आल्यास त्याची चकाकी कमी होऊ शकते. 
 
सोन्याचे दागिने नेहमी मऊ सुती कपड्यात बांधून वेगळे ठेवावे.
 
कोमट पाण्यात दागिने 15 मिनिटे बुडवून ठेवा. त्यामुळे त्यात साचलेले धुलीकण निघून जातील.
 
कोमट किंवा साध्या पाण्यात, सोडा वॉटरमध्ये थोडे लिक्विड डिटर्जंटचे काही थेंब टाकून त्यात थोडावेळ दागिने भिजत घाला. नंतर हळूहळू ब्रशने साफ करा.
 
दागिने साफ करताना लहान मुले दात घासण्यासाठी वापरतात तसा छोटा सॉफ्ट ब्रश वापरा. पण या ब्रशने
ते साफ करताना हळूवारपणे ब्रश फिरेल याची काळजी घ्या. 
 
दागिन्यांमध्ये मौल्यवान खडे असतील तर जास्त गरम पाणी किंवा उकळत पाण्याचा अजिबात वापर
करु नका. पाण्याचा उच्च तापमानामुळे दागिन्याला तडे जाण्याची शक्यता असते.
 
दागिने वापरून झाले की कापसाच्या बोळ्याने किंवा कपड्याने ते पुसून घ्या आणि कोरडे करून झाल्यानंतरच ते बॉक्समध्ये भरून ठेवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती