स्मरणिकाही बनली वादाचे मूळ

सांगलीतील संमेलनाप्रमाणेच महाबळेश्वर साहित्य संमेलनाची 'रानफूल' ही स्मरणिकाही वादाचे मूळ बनली आहे. या स्मरणिकेमध्ये आजी माजी अध्यक्षांची छायाचित्रेच गायब करून पाने कोरी ठेवण्यात आली आहेत. महामंडळाच्या नियमात राहूनच स्मरणिका तयार केली असल्याचे समितीकडून सांगण्यात येत आहे तर अध्यक्ष व माजी अध्यक्षांची छायाचित्रे छापण्याच्या सूचना दिल्या होत्या असे महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले-पाटील यांनी स्पष्ट केल्याने नवीनच वादाला तोंड फुटले आहे.

संमेलनस्थळाची पार्श्वभूमी, परंपरा व्यक्त करण्यासाठी प्रतिवर्षी संमेलनाची स्मरणिका प्रकाशित केली जाते. मात्र, आता ही स्मरणिकाही वादाचे कारण बनत आहे. डॉ. आनंद यादव यांच्या अध्यक्षपदाबाबत प्रश्नचिह्न कायम आहे. असे असताना संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रकाशित करण्यात आलेल्या 'रानफूल' या स्मरणिकेतील अध्यक्षांचे छायाचित्र गायब झाल्याने हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला जात आहे. संमेलनाकडे मावळते अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांनी पाठ फिरवणे व स्मरणिकेमध्ये त्यांचेही छायाचित्र नसणे, यामुळेही वेगळ्याच शंकेला तोंड फुटले आहे. अध्यक्षांचे छायाचित्रे अनवधानाने विसरली आहेत? या उत्तरालाही जागा उरलेली नाही कारण या छायाचित्रांची पाने कोरी आहेत.

याबाबत महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले-पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी स्वागत समितीला जबाबदार धरून आपली जबाबदारी झटकली. छायाचित्रांच्या मांडणीबाबत मी सूचना केल्या होत्या मात्र, तसे का झाले नाही, याची माहिती घेईन असा पारंपरिक उत्तर त्यांनी दिले आहे. मात्र, एकूणच हा प्रकार लक्षात घेता महामंडळाने जाणूनबुजूनच मनमानी कारभार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा