इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही,
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते !
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते ?
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी-
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !