फुंकर..

मंगळवार, 6 जुलै 2021 (12:23 IST)
फुंकर.. किती सुंदर अर्थवाही शब्द. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यापुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता. आणि अस्फुट ऐकूही येतो,  फू ऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्वास.

फुंकर.. एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळूवार भावनाविष्कार.
 
फुंकर
धनी निघाले शेतावरती
बांधून देण्या भाजी भाकर
चुलीत सारून चार लाकडे
निखार्‍यावर घाली फुंकर।
 
माय जाणते दमले खेळून
बाळ भुकेले स्नानानंतर
बशी धरूनी दोन्ही हातानी
दुधावरती हळूच फुंकर।
 
कुसुम कोमल तान्हे बालक
चळवळ भारी करी निरंतर
ओठ मुडपुनी हसे, घालता
चेहर्‍यावरती हळूच फुंकर।
 
खेळ खेळता सहज अंगणी
डोळ्यात उडे धूळ कंकर
नाजूक हाते उघडून डोळा
सखी घालते हळूच फुंकर।
 
राधारमण मुरलीधर
धरूनी वेणु अधरावर
काढीतसे मधु मधूर सूर
अलगुजात मारून फुंकर।
 
किती दिसांचा वियोग साहे
रागेजली ती प्रिया नवथर
कशी लाजते पहा खरोखर
तिच्या बटांवर घालून फुंकर।
 
सीमेवरूनी घरधनी येता
अल्प मिळाला संग खरोखर
रात जाहली पुरेत गप्पा
दिवा मालवा मारून फुंकर।
 
संसारातील जखमा, चटके
सोसायाचे जगणे खडतर
सुसह्य होते कुणी घालता
सहानुभूतीची हळूच फुंकर।
 
अटल आहे भोग भोगणे
कुणी गेल्याचे दु:ख भयंकर
पाठीवरती हात फिरवून
दु:खावरती घाला फुंकर।
 
कितीक महिने गेले उलटून
मित्र भेटही नाही लवकर
मैत्रीवरची धूळ झटकुया
पुनर्भेटीची घालून फुंकर।

- सोशल मीडिया 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती