तू - मी अन पाऊस

तू, मी अन पाऊस
सोबत छत्री नको घेऊस
बरसू दे थेंबांना अंगावर
निथळू दे त्यांना गालावरून
माझ्याकडे तू पहात असतांना
ओघळू दे त्यांना पापण्यांवरून
हे अनमोल क्षण प्रितीचे
नको तू हिरावून घेऊस
 
तू, मी अन पाऊस
सोबत छत्री नको घेऊस
झोंबेल वारा झोंबू दे
गारवा मनात पसरू दे
गंध मातीचा तुझ्या सवे
मनात माझ्या भिनू दे
घेण्या हातात हात माझा
आज तू नको लाजूस
 
तू, मी अन पाऊस
सोबत छत्री नको घेऊस
जवळ जरासा ये जरा
अधून मधून खेट जरा
तुझ्या त्या मोहक स्पर्शाने
अंगी वीज चमकेल जरा
गारवा दूर पळून जाईल
नको तू भानावर येऊस
 
तू, मी अन पाऊस
सोबत छत्री नको घेऊस
स्पर्श कधी नजरेचा तुझा
बेधुंद करेल माझ्या मना
बेभान होऊन जा तूही
ओंजळीत घे या क्षणा
या क्षणांना उरांत भरुनी
जन्मो जन्मीच्या शपथा घेऊ
 
तू, मी अन पाऊस
सोबत छत्री नको घेऊस..
 
( खडूस नॉन-रोमँटिक नवरा  )
 
 तू .... मी अन पाऊस
 
तू मी अन पाऊस ..
त्यात तुला फिरायची हौस !!
जा तू ,ये हूंदडून 
अन लवकर नको येऊस !!
 
थेंब बरसता गालावर ..
आणि पसरता अंगभर ..
जर उद्या झाली सर्दी .
तर मला नको सांगूस !!
 
हे अनमोल क्षण पावसाचे 
नको हिरावून घेऊस !!
जाताना चहा टाकून जा ..
त्यात आले नको विसरूस !!
 
आराम करेन मी घरी ..
तू जा पावसात खुशाल ..
पण जाताना माझी छत्री 
अजिबात नको नेऊस !!
 
झोंबेल वारा झोंबू दे ..
गारवा मनात पसरू दे ..
काय वाटेल ते होऊ दे ..
पण नंतर माझे 
डोके नको खाऊस !!
 
भिजुन ये थिजून ये ..
विजेखाली चमकून ये !!
घालायचा तो 
गोंधळ घालून ये !! 
पण परतल्यावर माझ्याकडे 
बाम नि क्रोसिन नको मागूस !!
 
अजून एक लक्षात घे ..
हिरमुसून नको जाऊस ..
पण एखाद्या वेळीच 
भिजणे चांगले ....
ऱोज रोज नको जाऊस !!
 
तू, मी अन पाउस !!

- Social Media

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती