भारताचे पंतप्रधान : श्री नरेंद्र मोदी

गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (14:45 IST)
२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले पहिले पंतप्रधान बनले.  गतिमान, समर्पित आणि करारी  नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अब्जावधी भारतीयांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित होतात.
 
मे २०१४ मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून, पंतप्रधान मोदी यांनी सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्रवासाला सुरुवात केली, ज्यामध्ये प्रत्येक भारतीय त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रत्यक्षात साकारू शकतील. रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत सेवा पुरवण्याच्या 'अंत्योदय' या तत्वाने ते प्रेरित आहेत.
 
नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून, प्रगतीची चाके वेगात फिरतील आणि प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची फळे पोहोचतील  याची सरकारने काळजी घेतली. प्रशासन खुले,सोपे आणि पारदर्शक बनले.
 
सर्वप्रथम, प्रधानमंत्री जन धन योजनेने देशाच्या वित्तीय व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला समाविष्ट करून आमूलाग्र बदल घडवून आणला.  व्यवसाय सुलभ करण्यावर भर देत 'मेक इन इंडिया' साठी त्यांनी केलेल्या आवाहनाने गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये अभूतपूर्व जोम आणि उत्साह निर्माण झाला. 'श्रमेव जयते'  उपक्रमांतर्गत, श्रम सुधारणा आणि श्रम प्रतिष्ठेने छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या अनेक कामगारांना सक्षम केले, तसेच आपल्या कुशल युवकांना प्रोत्साहन दिले.
 
सरकारने, प्रथमच देशातील जनतेसाठी तीन सामाजिक सुरक्षा योजना सुरु केल्या आणि वृद्धांना निवृत्तीवेतन आणि गरीबांना विमा संरक्षण पुरवण्यावर देखील भर दिला. जुलै २०१५ मध्ये, पंतप्रधानांनी डिजिटल भारत निर्माण करण्यासाठी डिजिटल भारत अभियानाचा शुभारंभ केला, ज्यात जनतेच्या राहणीमानात दर्जात्मक बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञान महत्वाची भूमिका पार पाडेल.
 
२ ऑक्टोबर २०१४ रोजी, महात्मा गांधींच्या जयंतीदिनी, पंतप्रधानांनी 'स्वच्छ भारत अभियान' ही देशभरात स्वच्छतेसाठी लोक चळवळ सुरु केली. या चळवळीची व्याप्ती आणि प्रभाव ऐतिहासिक आहे.
 
नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणातील उपाययोजनांनी भारताची  जगातील सर्वात मोठी लोकशाहीची खरी क्षमता आणि भूमिका जागतिक व्यासपीठावर साकारली. त्यांनी आपला कार्यभार सार्क राष्ट्रांच्या सर्व प्रमुखांच्या उपस्थितीत स्वीकारला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणाची जगभरातून प्रशंसा झाली. १७ वर्षांनंतर नेपाळचा, २८ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा,३१ वर्षांनंतर फिजीचा आणि ३४ वर्षांनंतर सेशेल्सचा द्विपक्षीय दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान बनले. कार्यभार स्वीकारल्यापासून, नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स,सार्क आणि जी-२० शिखर परिषदांना उपस्थित राहून, विविध जागतिक आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर व्यक्त केलेल्या भारताच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांनी केलेल्या जपान दौऱ्याने भारत-जपान संबंधांच्या नवीन पर्वातील रोमांचक अध्याय उलगडला. मंगोलियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आणि त्यांनी केलेला चीन आणि दक्षिण कोरियाचा दौरा भारतात गुंतवणूक आणण्यात यशस्वी ठरला.  युरोपबरोबरचे संबंध पुढे सुरु ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न फ्रान्स आणि जर्मनी दौऱ्यादरम्यान दिसून आला.
 
नरेंद्र मोदी यांनी अरब देशांबरोबर दृढ संबंध प्रस्थापित करण्याला अधिक महत्व दिले.  ऑगस्ट २०१५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणारे गेल्या ३४ वर्षातील ते पहिले भारतीय पंतप्रधान बनले, या दौऱ्यात आखाती देशांबरोबर विविध क्षेत्रात आर्थिक भागीदारी वृद्धिंगत करण्यात आली. जुलै २०१५ मध्ये मोदी यांनी पाच मध्य आशियाई देशांचा दौरा केला जो चाकोरीबाहेरचा होता. या दौऱ्यात भारत आणि या देशांदरम्यान ऊर्जा,व्यापार,सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात महत्वपूर्ण करार करण्यात आले. ऑक्टोबर २०१५ मध्ये नवी दिल्लीत ऐतिहासिक भारत-आफ्रिका शिखर परिषद झाली, ज्यामध्ये ५४ आफ्रिकी देशांनी भाग घेतला. ४१ आफ्रिकी देशांचे नेते या परिषदेला उपस्थित होते, ज्यामध्ये भारत-आफ्रिका संबंध वृद्धिंगत करण्यावर सखोल चर्चा झाली. पंतप्रधानांनी स्वतः भारत दौऱ्यावर आलेल्या आफ्रिकन नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या.
 
नोव्हेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान सीओपी २१ शिखर परिषदेला उपस्थित राहिले, जिथे त्यांनी अनेक जागतिक नेत्यांबरोबर हवामान बदलाच्या समस्येवर चर्चा केली. मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे उदघाटन केले, ज्याद्वारे घरगुती वापरासाठी सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे.
 
एप्रिल २०१६ मध्ये पंतप्रधानांनी अणु सुरक्षा शिखर परिषदेत भाग घेतला जिथे त्यांनी जागतिक मंचावर अणु सुरक्षेच्या महत्वाबाबत ठाम संदेश दिला. त्यांनी सौदी अरेबियाला भेट दिली, तिथे त्यांना साश ऑफ किंग अब्दुल अझीझ हा सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी भारताला भेट दिली आणि या भेटींमुळे भारताचे या देशांबरोबरचे सहकार्य सुधारण्यात मोठी मदत झाली. २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिन सोहोळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित होते, भारत-अमेरिका संबंधांच्या इतिहासात प्रथमच असे घडले. ऑगस्ट २०१५ मध्ये भारताने एफआयपीआयसी शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले, पॅसिफिक बेटांमधील वरिष्ठ नेते या परिषदेला उपस्थित होते. पॅसिफिक बेटांबरोबर भारताच्या संबंधातील मुख्य मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
 
वर्षातील एक दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन ' म्हणून साजरा करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच,जगभरातील १७७ देश एकत्र आले आणि २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन ' म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
 
गुजरातमधील लहान शहरात 17 सप्टेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म झाला. गरीब परंतु प्रेमळ कुटुंबात त्यांचे बालपण गेले. आयुष्यातील सुरुवातीच्या हलाखीच्या परिस्थितीने त्यांना कठोर परिश्रमाचा धडा दिला, मात्र त्याचबरोबर सामान्य जनतेच्या टाळता येण्याजोग्या हालअपेष्टांची त्यांना जाणीव झाली. यातूनच तरुण वयात देशासाठी आणि जनतेच्या सेवेत स्वत:ला वाहून घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सुरुवातीच्या काळात, त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या राष्ट्रवादी संघटनेबरोबर काम केले. त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टी संघटनेबरोबर काम करताना त्यांनी स्वत:ला राजकारणात झोकून दिले. गुजरात विद्यापीठातून मोदी यांनी राज्यशास्त्रात एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले.
 
वर्ष 2001 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी चार कार्यकाळ पूर्ण केले. विनाशकारी भूकंपाच्या दुष्परिणामांचा सामना करणाऱ्या गुजरातचा त्यांनी विकास इंजिनाच्या रुपात कायापालट केला आणि आज हे राज्य भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
 
नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’ आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांना लोकांमध्ये राहायला, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आणि त्यांची दु:खं दूर करण्यात समाधान मिळते. लोकांशी थेट संपर्काबरोबरच ऑनलाईन संवादाचीही ते जोड देतात. भारताचे सर्वाधिक टेक्नो-सॅव्ही नेते म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ते वेबचा वापर करतात. Facebook, Twitter, Google+, Instagram, sound cloud, Linkedin, weibo यांसारख्या अन्य सोशल मिडिया व्यासपीठावर ते खूप सक्रिय आहेत.
 
राजकारणाव्यतिरिक्त नरेंद्र मोदींना लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात कवितांचाही समावेश आहे. ते आपल्या दिवसाची सुरुवात योग साधनेतून करतात. योग केल्यामुळे त्यांचे शरीर आणि मन संतुलित राहते आणि अतिशय धकाधकीच्या दैनंदिन जीवनात त्यांना शांतीची अनुभूती मिळते.
 
ही व्यक्ती, साहस, करूणा आणि विश्वासाची साकार मूर्ती आहे. भारताचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी दीपस्तंभ बनवण्याच्या विश्वासापोटी भारतीयांनी त्यांना आपला जनादेश दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती