'त्याच्या'शिवाय कशी जगू ?

वेबदुनिया

शुक्रवार, 20 मे 2011 (16:57 IST)
ND

'मी बी.कॉम आहे आणि तो दहावी नापास. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तो शिकलेला नाही याचं मला काही वाटत नाही. तो त्याच्या कामात चोख आहे. चांगले पैसे कमावतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो खूप चांगला आहे. त्याच्या घरात आमच्या प्रेमाबद्दल माहीत आहे; पण पाठिंबा नाही. माझ्या घरचे तयार आहेत, पण तो त्याच्या घरच्यांना समजावून देऊ शकत नाहीये. याचा सगळ्याचा माझ्यावर प्रचंड ताण येतो आहे. सगळ्या कॉलनीला आणि नातेवाईकांमध्ये आमच्या प्रेमाबद्दल माहीत आहे. त्याच्याशी लग्न झालं नाही तर मी काय करू? इतर कुणाचा विचार मी नाही करू शकणार. काय करावं काहीच सुचत नाहीये. हा ताण आता सोसवत नाही. घरातून पळून जाण्याचा विचार मनात येतो. पण आईला सोडून कसं जाऊ? सगळीकडूनच कोंडी झालेली आहे.'

- सुनीताच्या पत्रातून तिची अस्वस्थता जाणवत होती.
प्रेमाची भानगड जोवर घरात माहीत नसते तोवर सगळं ठीक असतं. पण ज्या क्षणी घरच्यांना या सगळ्याबद्दल माहीत होतं खऱ्या अर्थानं गुंते वाढत जातात. आता सुनीताच्या बाबतीतच बोलायचं झालं तर सगळ्या गावाला तिच्या प्रेमाबद्दल माहीत आहे. त्यामुळे त्याच्याशी लग्न झालं नाही तर लोकं काय म्हणतील ही भीती तिला आणि तिच्या घरच्यांना वाटते आहे. त्यांची भीती अगदीच रास्त आहे. लहान गावात विशेषत: अशा वेळी लोकं वाट्टेल ते बोलायला मागेपुढे बघत नाहीत. पण लोकांचा विचार कुठवर करायचा हेही ज्यानं त्यानं ठरवायला पाहिजे. उद्या समजा दुर्दैवानं सुनीताचं लग्न त्या मुलाशी होऊ शकलं नाही तरी त्यामुळे काही जगणं संपत नाही. आयुष्यातला एक दुर्दैवी कालखंड असं समजून पान उलटून पुढे जाता यायलाच पाहिजे. पण अशा परिस्थितीत आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोलणे अत्यंत आवश्यक असतं. सुनीताच्या बाबतीच तिच्या मित्राने त्याच्या आईबाबांशी स्वत:च्या प्रेमाबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. नुसती चर्चा करून थांबून चालणार नाही तर स्वत:च्या मतावर तो ठाम आहे हेही त्याने त्याच्या आणि तिच्या आईबाबांपर्यंत पोचवायला पाहिजे.
सुनीताच्या पत्राचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात विचार करायचा म्हटला तरीही ज्यावेळी असे अवघड प्रसंग येतात, प्रेमाची परीक्षा बघणारा काळ असतो त्यावेळी त्याने आणि तिने एकमेकांचा आधार बनणं, एकमेकांना मानसिक ताकद देणं आणि एकमेकांना त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मदत करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण ही लढाई आहे जी आपल्याच घरातल्या माणसांबरोबर लढायची असते. आणि म्हणूनच ही लढाई सगळ्यात अवघड असते. अशा वेळी त्याने आणि तिने सर्वार्धानं एकमेकांची साथ दिली नाही आणि त्यांच्यातला कुणीतरी एक जण जर एकटा पडला तर त्याच्या मनात सुनीताच्या मनात उभे राहतायेत तसले प्रश्न उभे राहतात. ज्या प्रश्नांची उत्तरं शोधायला अशा वेळी तुम्ही मानसिक अर्थाने असमर्थ असता.
प्रश्न कितीही जटिल असले, समस्या कितीही मोठी असली तरी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढता येऊ शकतो. गरज असते ती एकमेकांची सोबत करण्याची. एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची !
प्रेममंत्र
१) प्रेम केलं आहे निभावण्यासाठी.. हे एकदा मनाशी पक्कं ठरवा म्हणजे मग कुठल्याही समस्येला तोंड देताना पाय डगमगणार नाही.
२) शेवटच्या क्षणापर्यंत समस्येतून बाहेर पडण्याचा, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
३) प्रश्न सुटणार नाही असं वाटलं, आणि प्रेम भावनेपेक्षा कुटुंबाच्या सुखदु:खाचा विचार करून प्रेमभंग करण्याचा निर्णय घेतलात तरी त्या नैराश्यातून चटकन बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
४) प्रेम हे आयुष्य असलं तरी प्रेमभंगाने जगणं कधीच थांबत नसतं. तसं ते थांबू नये. त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयाची जबाबदारी उचलायची तयारी ठेवा. आणि त्या निर्णयाच्या बऱ्या - वाईट परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा.

वेबदुनिया वर वाचा