बोध कथा : लबाड मांजर

गुरूवार, 16 एप्रिल 2020 (20:49 IST)
एका झाडावर घरटं बांधून एक पक्षी राहत होता. दाण्याच्या शोधात तो जवळच्या शेतात जातो तिथे जेवण्यासाठीचे चांगले धान्य बघून तो फार आनंदी होतो. त्या दिवसा पासून तो तिथेच राहू लागतो आणि आपले दिवस मजेत घालवू लागतो. संध्याकाळी त्या झाडाजवळ एक ससा येतो, घरट्यामध्ये डोकावून बघितल्यावर त्याला ते घरटं रिकामे दिसले. घरटं एवढे मोठे होते की तो आरामात त्याच्यांमध्ये राहू शकत होता. त्याला हे घरटं आवडले त्याने तिथेच राहण्याचे ठरविले. 
 
काही दिवसानंतर तो पक्षी खाऊन खाऊन जाडं झाल्यावर आपल्या घरट्यात परत येतो. तेव्हा तो तिथे एका ससा बघतो. तो त्या सस्याला रागावतो आणि म्हणतो मी इथे नव्हतो तर तू माझ्या घरात कसे काय शिरलास? तुला असे करताना काही शरम नाही वाटली कां? सस्याने शांतपणाने उत्तर दिले तुझे घर कुठे आहे ? तुझे घर आता हे माझे घर आहे. तू काय वेड्या सारखे बडबड करतोयस. अरे मूर्खां ! कोणी झाडं, विहीर, तलाव सोडून गेले की आपला त्या जागेवरून हक्क गमावतो. जो पर्यंत आपण तेथे राहत असतो तो पर्यंतच ते आपलं घर असतं. एकदा जागा सोडली की त्यात कोणीही राहू शकतं. आता तू इथून जा आणि मला अजिबात त्रास देऊ नकोस.
 
असे ऐकल्यावर तो पक्षी चिडू लागला आणि म्हणाला असे युक्तिवाद करून काहीही मिळणार नाही. चल आपण एखाद्या धर्माभिमानी कडे जाऊ या तो ज्याचा बाजूने निकाल देईल त्यालाच घराचा ताबा मिळेल. त्या झाडाजवळून एक झरा वाहत होता तिथे एक मांजर बसली होती. ती काही धार्मिक कार्य करत होती. ते दोघे तिच्या कडे गेले. जरी मांजर दोघांची शत्रू होती पण तेथे अजून कोणीच नव्हते. म्हणून त्यांना तिच्याकडून न्याय घेणे योग्य वाटले. सावधगिरीने ते दोघे मांजरीपाशी जाऊन आपली समस्या तिच्या समोर मांडू लागले. 
 
ते म्हणाले आम्ही आपल्याला आमची समस्या सांगितली आहे आता आपण यावर खात्रीशीर उपाय सांगा. जे खरे असेल त्याला घरटं मिळेल आणि जे खोटे बोलत असेल आपण त्याचे भक्षण करावे. मांजराने लगेच उत्तर दिले अरे आपण हे काय म्हणत आहात. या जगामध्ये हिंसाचारासारखे पाप नाही. जो दुसऱ्याला मारतो तो नरक यातना भोगतो. मी तुम्हाला न्याय देण्यात साहाय्य करेन. पण खोटं बोलणाऱ्या मी खाऊ हे काही माझ्या कडून होणार नाही. 
 
आता मी तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगते जरा तुम्ही माझ्या जवळ या आणि कानात ऐका. ससा आणि पक्षी दोघे ही आनंदीत होऊन काहीही विचार न करता मांजरी जवळ जातात. त्यांना असे वाटत असतं की चला आता निर्णय होईल. ते मांजरीच्या जवळ जाताच मांजर सस्याला पकडते आणि पक्ष्यावर झडप घालते आणि दोघांना मारून टाकते. आपल्या शत्रूला ओळखून सुद्धा त्याचा वर विश्वास ठेवल्याने त्या दोघांना आपले प्राण गमवावे लागले. 
 
बोध - कधीही आपल्या शत्रूंवर विश्वास ठेवू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती