बोध कथा : कोल्हा आणि सारस

गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (17:17 IST)
एका जंगलात एक हुशार कोल्हा राहायचा. त्याला इतरांना फसवण्यात फार आनंद वाटायचा. त्या कोल्ह्याची मैत्री एका सारसशी होते. तो सारस फार भोळा होता. एके दिवशी कोल्ह्याने विचार केला की या सारसाशी थट्टा मस्करी करावी. हा विचार करून कोल्हा सारस कडे जाऊन म्हणाला - 'मित्रा उद्या माझ्याकडे जेवायला ये. 'धन्यवाद मित्रा आपण मला जेवण्याचे आमंत्रण दिले मी नक्की येईन.' सारस म्हणाला.
 
ठरलेल्या वेळी सारस कोल्ह्याकडे जेवायला जातो. जेवण्याची वेळ आल्यावर कोल्ह्याने ठरविल्या प्रमाणे सारस ला ताटलीत सूप पिण्यासाठी दिले. सूप ताटलीत पिणे हे काही समस्या नव्हती, पण सारस फक्त त्याच्या लांब चोचीचे टोकच त्या सुपात बुडवू शकला. त्याला सूप पीता येत नव्हते कारण कोल्ह्याने दिलेली ताटली पसरट होती आणि सारस ची चोच लांब होती. कोल्हा तर पटापट सूप पिऊन गेला आणि सारस बिचारा उपाशी राहिला.
 
सारसला फार लाजिरवाणे झाले. त्या कोल्ह्याने त्याचा अपमान केला आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याला समजले की कोल्ह्याने त्याची थट्टा मस्करी करण्यासाठीच त्याला जेवण्याचे आमंत्रण दिले होते. 
इथे कोल्ह्याने त्याला विचारले की 'अरे मित्रा तू काहीच खात नाही तुला जेवण आवडले नाही का? 
तर सारस म्हणाला- 'धन्यवाद मित्रा मला जेवण फार चविष्ट आहे' तू देखील माझ्याकडे जेवायला ये आणि जेवण्याचा आनंद घे' सारस ने विचार केला की ह्या लबाड कोल्ह्याला त्याच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे. ह्याने जो माझा अपमान केला आहे मी त्याची परतफेड त्याला देणारच.
 
दुसऱ्याच दिवशी कोल्हा सारसच्या घरी जेवायला जातो. तो आपल्यासह सारस ला देण्यासाठी काहीही भेट वस्तू आणत नाही.
'आता तर मी भरपूर जेवणार' असा विचार कोल्हा करीत होता. 
सारस ने देखील जेवण्यासाठी सूप बनविले होते. सूपचा मस्त सुवास घरात दरवळत होता त्या कोल्ह्याची वासानेच भूक वाढली. त्याने बघितले तर काय सारस ने एका लांबोळ खोल अशा पात्रात सूप दिले होते. सारस ची चोंच लांब असल्यामुळे तो सहजपणे त्या पात्रातून सूप पीत होता. पण कोल्ह्याचे तोंड त्यामध्ये जातच नव्हते. बरेच प्रयत्न केल्यावर देखील कोल्हा सूप काही पिऊ शकला नाही आणि त्याला उपाशीच राहावे लागले. अशा प्रकारे सारस ने न बोलता आपल्या अपमानाची परतफेड केली आणि त्याची खोड मोडली.
 
तात्पर्य : जश्याच तसे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती