शुक्राचे अधिक्रमण ६ जून रोजी!

सोमवार, 14 मे 2012 (11:41 IST)
WD
खगोलशास्त्रातील अतिशय दुर्मीळ घटना ६ जून रोजी घडणार आहे. ती म्हणजे शुक्राचे अधिक्रमण होय. या घटनेला खगोलशास्त्रात फार महत्त्व आहे. कारण सर्वांच्या आयुष्यात शुक्राचे अधिक्रमण पाहण्याची ही शेवटची संधी आहे.

यापुढील शुक्राचे अधिक्रमण तब्बल १0५ वर्षांनी म्हणजेच १0 डिसेंबर २११७ रोजी होणार आहे. ६ जून रोजी सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी शुक्र सूर्यबिंबावर असताना सूर्योदय होणार आहे. सकाळी १0 वाजून ५ मिनिटांनी शुक्रबिंब सूर्यबिंबावरून बाहेर पडायला प्रारंभ होईल. सकाळी १0 वाजून २३ मिनिटांनी संपूर्ण शुक्रबिंब सूर्यबिंबावरून बाहेर पडताना दिसू शकणार नाही. सूर्यबिंबावरून चंद्र गेला म्हणजे त्या घटनेला आपण चंद्रग्रहण लागले असे म्हणतो. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान चंद्र येऊ शकतो म्हणूनच सूर्यग्रहण घडू शकते. बुध आणि शुक्र या दोन ग्रहांच्या सूर्याभोवती फिरणार्‍या कक्षा पृथ्वी कक्षेच्या आत असल्याने हे दोन ग्रह सुद्धा सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येऊ शकतात. त्याचवेळी त्याचे बिंब सूर्यबिंबावरून जाताना दिसू शकते. अशा अर्थाने शुक्राने किंवा बुधाने सूर्याला लावलेले हे एक ग्रहणच आहे. मात्र या ग्रहाची बिंबे सूर्यबिंबापेक्षा लहान असल्याने हे ग्रह चंद्राप्रमाणे सूर्यबिंबाला झाकू शकत नाही. बुध किंवा शुक्र बिंबाच्या सूर्यबिंबावरून होणार्‍या या प्रवासाला खगोलशास्त्रात अधिक्रमण (ट्रन्झिट) असे म्हणतात. शुक्राचे अधिक्रमण साध्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. कोणी साध्या डोळ्याने अधिक्रमण बघण्याचा प्रयत्न केल्यास ही बाब डोळ्यांकरिता अतिशय धोकादायक ठरु शकते.

वेबदुनिया वर वाचा