सर्वसाधारणपणे एका महिन्यात एकच पौर्णिमा असते, मात्र ऑगस्ट महिन्यात दोन पौर्णिमा येण्याचा योग आला आहे. बुधवारी 1 ऑगस्टला यामधील पहिली पौर्णिमा असून दुसरी पौर्णिमा महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 ऑगस्टला आहे. ज्यावेळी अशा दोन पौर्णिमा एका महिन्यात येतात त्यावेळी दुसर्या पौर्णिमेला 'ब्लू मून' असे म्हटले जाते.
'ब्लू मून' म्हणजे चंद्र त्या दिवशी निळा किंवा मोठ्या आकाराचा दिसणार असे काही नाही. सर्वसाधारणपणे पौर्णिमेला जसा चंद्र असतो, तसाच त्या दिवशीही असतो, पण दुसरी पौर्णिमा असल्याने त्याला असे 'नीकनेम' देण्यात आले आहे. काही विशिष्ट परिस्थितीत चंद्राचा रंग थोडा पालटल्यासारखाही दिसू शकतो. जंगलातील वणवा किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास त्या धुरात चंद्राचा रंग निळसर किंवा हलका जांभळा दिसतो. राखेचे कण पृथ्वीच्या वातावरणात पसरल्यामुळे असा बदल दिसतो. असा निळा चंद्र सप्टेंबर 1950 मध्ये उत्तर अमेरिकेत दिसला होता. त्याचे कारण म्हणजे पश्चिम कॅनडातील जंगलात लागलेला वणवा. जनू 1991मध्ये फिलीपाईन्समध्ये माऊं पिनाट्यूबो ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर असा निळा चंद्र दिसला होता. काही वेळा सूर्यही अशा कारणामुळे निळा दिसल्याच्या घटना घडल्या आहेत.