ह्या रोगात रूग्णाला कशानेच आराम पडत नसे. पालकांच्या डोळ्यात आजारासंबंधी थोडा जरी अविश्वास दिसला तरी लक्षणे भलतीच उफाळून येत..मग रूग्ण गडाबडा लोळूही लागे, मधेच पोट दुखू लागे, कधी भयंकर डोकं दुखे.. रूग्ण पोट दाबून मोठमोठ्याने विव्हळत असे.. डोकं गच्च दाबून उशीत खुपसत असे...
ताप उलट्या अशी दृष्य लक्षणे ह्या रोगात अजिबात नसत.. फक्त आतून दुखणारी लक्षणे..बहुतेक पालकांना ह्या रोगाची कारण मिमांसा माहीत असे...... पण रोग्याने अजून जास्त आजारी पडू नये म्हणून ते रूग्णापुढे हात टेकत, आणि परवलीचा मंत्र म्हणत.."बरं, नको जाऊस शाळेत".. बस एवढा मंत्र कानावर पडला की रूग्णाला विंचू उतरावा तसा उतार पडायला सुरूवात होई.. आणि एखाद्या तासात रूग्ण टुणटुणीत होऊन गावभर उंडारू लागे..