शनिवार, 7 एप्रिल 2018 (12:39 IST)
सारख्या सूचना देणारी का होईना
पण सासू सर्वांनाच असावी..
कुळाचार शिकवताना हळवी होणारी,
आपल्या संसाराची कहाणी सांगणारी,
तरीही त्यात 'मीपणा' नसणारी,
प्रेमाने सर्वांना खाऊ घालणारी,
प्रेमळ सासू सर्वांनाच मिळावी..
स्त्री म्हणून मर्यादा शिकवणारी,
चुकलं तर शिक्षिकेसारखी समजावून सांगणारी,
ह्यात साखर नाही हो, ह्यात गूळ घालायचा,
त्यात पाणी नाही हो, वाफेवरच शिजवायचा,
अन्नपूर्णा गृही नंदण्यासाठी तरी,
सासू प्रत्येकीला मिळावी..
भाजलं, लागलं तर प्रेमाने फुंकर घालणारी,
वेळ प्रसंगी, असं चालत नाही म्हणून दटावणारी,
आईच्या मायेने सुनेला जवळ घेणारी,
दमलीस का गं.. म्हणून घोटभर चहा देणारी,
माया आईची, धाक बाबांचा असं अजब रसायन असणारी,
घरातली करती सासू सर्वांनाच मिळावी..
प्रेमाचा हा झरा प्रत्येकीच्या वाट्याला येत नाही,
सासूच्या रूपातील आई सर्वांनाच मिळत नाही,
असेल पुर्व पुण्याई तरच लाभते छत्रछाया तिची,
नाहीतर सासरी येऊन, सून कायमची पोरकी..
नाहीतर सासरी येऊन, सून कायमची पोरकी..