उशीर झाल्यावर आपली पण वाट पाहणारे कोणीतरी असते याची किंमत मला मी 'आई' झाल्यावर कळली.
आज का कोण जाणे आईची खूप आठवण आली दिवा लावताना...
ये ग जरा वेळ काढून. अधूनमधून यावं मुली ने माहेर पणाला . मी गेल्यावर किंमत कळेल बघ माहेरपणाची. असे नेहमी म्हणायची. कसे तरीच वाटायचे मनाला . आज आई नाही, तिची मायेची हाक नाही. आज माझ्या 'सासरी' गेलेल्या मुलीची वाट पाहताना जाणवते माझ्या आईचे लेकीच्या भेटीसाठी तळमळणारे हृदय.
मग कळले आई होणे म्हणजे काय असते..
आपसूकच तिन्हीसांजेला दिवा लावू लागले न विसरता .पण आज ही दिवा लावताना आठवते माझे माहेर. आई चे मनाचे श्लोक , तिची कारुण्याने भरलेल्या स्वरातली करुणाष्टके , त्यातच मिसळलेला कुकर च्या शिट्टी चा आवाज , उदबत्ती च्या घमघामाटा बरोबरच आंबेमोहोर तांदळा चा भात आणि हळद हिंग घालून शिजवलेल्या वरणाचा तोंडाला पाणी सुटणारा वास,
माझी साधी सोपी 'माहेरा' ची व्याख्या.
खरंच माहेरवाशिणी ...जर माझे मनोगत वाचत असतील तर नक्की भेटून या आपल्या आई ला. एखादा फोन तरी कराच. आई मला म्हणायची तू पक्की आई झालीयस . मुलींशिवाय दुसरे काही तुला सुचतच नाही.मुली ची आई होणं सोपं नाही ग बाई!! आधी तिची मैत्रीण हो मग तुझी लेक तुझं 'आईपण' सहज स्वीकारेल.