जगण्यात आनंद शोधा ....

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (12:00 IST)
"मृत्यू समीप आलेल्या 
अनेक जीवांच्या 
अखेरच्या दिवसांचा 
घेतलेला एक शास्त्रीय मागोवा."
 
वेगवेगळ्या धर्माचे, 
जातींचे, पंथांचे रुग्ण, 
पॅलिएटिव्ह केअर हा 
हॉस्पीटलमधला 
भाग संपवून जेव्हा 
आपल्या घरी जातात 
 
तेव्हा परत न येण्यासाठीच 
हे साऱ्यांनाच ठाऊक असते.
 
आता यापुढे फॉलो-अप नसतो; 
असलाच तर 
पुढच्या जन्मातला 
फॉलो-ऑन असतो.
 
या रुग्णांना जेव्हा 
विचारले की, 
कोणत्या गोष्टींची 
त्यांना खंत वाटते ? 
 
काही राहून गेल्यासारखे 
वाटते का ? 
 
तेव्हा मिळालेल्या 
उत्तरांमध्ये विलक्षण 
साधर्म्य होते.
 
शेवटच्या प्रवासाला 
निघताना त्यांनी 
मागे वळून पाहिल्यावर 
त्यांना जे जाणवले, 
 
त्यापासून अजून 
त्या अनंताच्या 
प्रवासापासून दूर 
असलेल्या अनेकांनी 
पुष्कळ काही 
शिकण्यासारखे आहे.
 
प्रत्येकाला त्याच्या जीवनातले 
कटू क्षण, भांडणे, हेवेदावे, 
ऑफिसमधील कुरघोडी, 
जोडीदारांबरोबरचे मतभेद, 
अबोला, ईर्षां, स्पर्धा 
हे प्रकर्षांने आठवले आणि 
 
आपण त्यात आपल्या 
जीवनाचा 
अमूल्य काळ घालवला; 
अक्षरश: मातीमोल केला, 
अशी भावना झाली. 
 
त्या वेळेला आपण 
त्या भावनांनी 
आंधळे झालो होतो, 
आज खऱ्या अर्थाने 
डोळे मिटायची 
वेळ आल्यावर 
 
त्या फोलपणामुळे 
डोळे उघडले आहेत, 
असे वाटू लागले.
 
ती भांडणे, वादविवाद वेळीच मिटवले असते तर.........
 
कदाचित आयुष्याला 
वेगळा अर्थ प्राप्त होता.
 
जीवनात अनेकांविषयी 
प्रेमभावना, आवड, 
आदर वाटला, 
पण संकोचाच्या बेडय़ांनी 
ते व्यक्त करणे राहून गेले.
 
गेल्या काही वर्षांत 
‘झप्पी’ देण्याचा 
उदयास आलेला भाव 
हा अधिकाधिक 
जागविला असता तर ...
शब्दाशिवाय 
भावना पोहोचल्या असत्या, 
हेही खरे आहे.
 
पुरुषांच्या आणि 
काही अंशी 
उद्योग-व्यवसायात 
गर्क असलेल्या स्त्रिया 
कुटुंबासाठी पुरेसा वेळ 
काढू शकल्या नाहीत. 
 
मुले मोठी झाली, 
स्वतंत्र झाली, 
त्यांचे बालपण सरले, 
 
पण या बालपणातल्या 
अनेक सुंदर गोष्टींचा 
अनुभव यांना 
मुकावा लागला, 
 
कारण ते त्या वेळेत 
त्यांच्या व्यक्तिमत्त्व 
विकासात गर्क होते.
 
आज मागे वळून 
बघताना वाटतेय.., 
 
मुलांना जवळ 
घ्यायला हवे होते, 
 
त्यांच्या केसांमधून 
हात फिरवायचा 
राहून गेला.., 
 
त्यांना न्हाऊ -खाऊ, 
वेणी-फणी करायचे 
राहून गेले, 
 
त्यांना घोडा 
कधी केला नाही, 
 
आयुष्यभर जबाबदारी अन कर्तव्याचीच ओझी अंगावर घेत आलो, 
 
पण करीअर 
करण्याच्या नादात 
मुलांना कधी 
अंगा खांद्यावर 
घेतले नाही. 
 
त्यांचे कोड-कौतुक 
कधी केले नाही, 
 
पैसा बक्कळ होता पण 
अवास्तव गरजे पोटी 
विनाकारण त्याच्या मागे 
धावत होतो. 
 
आता मुले जवळ नाहीत आणि 
हातही उचलवत नाही.
 
मागे उरलीय फक्त थरथर…..!!!
 
क्षमा करायला शिकायचे राहून गेले, 
 
अपमान गिळून टाकायला शिकायचे राहून गेले. 
 
धबधब्यात भिजायचे 
राहून गेले.., 
 
प्रवाहा विरुद्ध 
पोहायचेही 
राहून गेले.
 
लोक काय म्हणतील, 
हा प्रश्न लाथाडायचे 
राहून गेले. 
 
उन्मुक्त उधळून 
घ्यायचे 
राहून गेले.., 
 
उधाण वारा प्यायचे 
राहून गेले. 
 
नव्या पोतडीत 
हात घालायचा 
प्रयत्न करायचे 
राहून गेले. 
 
पराभवाच्या भीतीला 
ठेंगा दाखवायचे 
राहून गेले. 
 
साध्या - साध्या गोष्टींमध्ये खूप आनंद असतो, 
 
हे मान्य करायचे राहून गेले.
 
लेख संपविताना 
माझे डोळे भरून आले 
 
आणि आरती प्रभूंच्या 
ओळी आठवल्या-
 
‘‘गेले द्यायचे राहूनि; तुझे नक्षत्रांचे देणे ’
 
*अजूनही वेळ गेलेली नाही .... जगण्यात आनंद शोधा .... तक्रारी तर कधीच संपणार नाहीत...
Dr. Sanjay Oak
(Ex- Dean, K. E. M. Hospital, Mumbai)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती