....खरच आपण सुधारलोय का ?

पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून निघायचं
अचानक भेटीचा आनंद 
चेहऱ्यावर पसरायचा
मग सुरू व्हायचं खाणं-पिणं
गप्पाटप्पा, चेष्टा-मस्करी, चर्चा-चर्वण
एकच धमाल उडायची
दिवसदिवसभर
 
तेव्हा चेहरे वाचता यायचे
ओठच नव्हे, तर डोळेही बोलायचे
डोळेच नव्हे तर 
संपूर्ण देहबोलीच संभाषण होऊन जायची !
गळाभेटी, टाळ्यांनी
प्रेमाची कारंजी उडायची
 
निघताना ‘थांबा हो’, ‘बसा हो’
‘काय घाई आहे ?’ असा आग्रह
हस्तांदोलन, कपाळावर कुंकू
एखादी भेटवस्तू
नाहीतर काही वानोळा
दूर जाईपर्यंत हलणारे हात...
 
आता मात्र हे क्षण 
दुर्मिळ होत चालले आहेत
आता सगळा यांत्रिक मामला
भेटी-गाठींना असंख्य पर्याय आलेले 
नेटवर भेटा, बोला
नाहीतर तासन्‌तास बसा वाजवत 
मोबाईलवर 
शब्दांचे खुळखुळे !
 
....खरच आपण सुधारलोय का ?

वेबदुनिया वर वाचा