आता घराकडं चार आठ दिवस आलेली पाखरं परतण्याच्या तयारीत,
सामानाची चाललेली बांधाबांध,
उद्या निघायची तयारी !
आई - आज्जीची भरुन येणारे डोळे लपवत डबे भरुन देण्याची चाललेली गडबड...
बाबांची - आजोबांची थरथरत येणारी हांक...
चष्म्याआडून भरलेले डोळे लपवत
त्यांचं सुरु असलेलं
पण मन लागत नसलेलं
कसलंतरी वाचन !
मधेच कधी तरी, "अजून एक दोन दिवस नाही का रे थांबता येणार तुम्हाला ?"
काय सांगायचं उत्तर या प्रश्नाचं ?
परत केव्हा येणार ?
परत केव्हा भेटणार ?
हेच प्रश्न त्यांच्या डोळ्यातून फुटणारे !
वर्षभर इतर वेळी घरी येतो आणि जातोही पण तेव्हा असं नाही जाणवत मग दिवाळी करुन परत जातानाच हे असं का ?
दिवाळी आली,
आणि
दिवाळी निघाली !
सगळे गंध,
सगळं तेज,
सगळी आपुलकी,
मनामनात भरुन निघाली !
कासावीस व्हायला होतं...
जीवघेणी वेळ आली आहे असं वाटतं ! एखाद्या अतिसुंदर, अवर्णनीय मैफिलीची भैरवी होताना असंच होतं ना ! ती मैफिल पूर्ण होताना एखाद्या अपूर्णतेची अनामिक हुरहूर मनात ठेवतेच ना ! ती अपूर्णता कोणती ते मात्र कळत नाही... व्याकुळता वाढवते ती अपूर्णता !
तसंच दिवाळीचं...
आज तीच हुरहूर...
तीच व्याकुळता...
तीच कातरता...
तोच हळवेपणा...
भरुन उरलंय मनात !
तरीपण तिला देखणा आणि
तिच्यासारखांच तेजाळ निरोप द्यायलाच हवा, तिच्यासाठी कृतज्ञता तर व्यक्त व्हायलाच हवी !